ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मानसिक रुग्णतेने त्रस्त अंजूची कुटुंबासोबत यशस्वी पुनर्भेटी!

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : सात महिन्यांपासून बेपत्ता असलेली देवरिया (उत्तर प्रदेश) येथील अंजू राजभर (बदललेले नाव – अंशिका) ही मानसिक रुग्ण महिला अखेर आपल्या कुटुंबाशी पुन्हा एकत्र आली आहे. घुग्घुस पोलिसांनी तिला रस्त्यावरून रेस्क्यू करून श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन, नागपूर येथे उपचारासाठी दाखल केले होते. फाउंडेशनच्या प्रयत्नांमुळे उपचार आणि पुनर्वसन यशस्वी ठरले व अखेर तिची आपल्या कुटुंबाशी भेट घडवून आणण्यात आली.

अंजूचा पती कोरोना काळात निधन पावल्यानंतर ती तीव्र नैराश्यात गेली होती. औषधोपचार टाळल्याने तिची मानसिक स्थिती आणखी बिघडली. घरातून मावशीकडे जात असल्याचे सांगून ती बाहेर पडली होती, मात्र ती परतलीच नाही. कुटुंबीयांच्या शोधानंतरही ती न सापडल्याने ती निराधार अवस्थेत महाराष्ट्रात, चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे आली होती.

२१ जून २०२५ रोजी घुग्घुस पोलिसांनी तिला रस्त्यावरून फिरताना पाहिले आणि तत्काळ श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन, नागपूर येथे दाखल केले. उपचारादरम्यान तिने आपला पत्ता बरहज, देवरिया (उत्तर प्रदेश) येथील असल्याचे सांगितले. त्यानुसार फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या गावी जाऊन तिच्या कुटुंबाचा शोध घेतला.

२३ ऑगस्ट २०२५ रोजी अंजूला तिच्या सासरे, सासू यांच्या उपस्थितीत अधिकृतरीत्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले. या पुनर्भेटीत अंजूला तिच्या दोन मुली, सासू-सासरे व दीर यांच्यासोबत पाहून सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.

या कार्यासाठी घुग्घुस पोलिस स्टेशन आणि श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन, नागपूर यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या मदतीमुळे एका निराधार महिलेला तिचे हरवलेले कुटुंब परत मिळाले आणि तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये