ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिंपरी बाजार समितीत मका खरेदी प्रक्रिया सुरळीत

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सुरू असलेली मका खरेदी प्रक्रिया पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना वेळेत सेवा देण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यंदा मोठ्या प्रमाणात मका बाजार समितीत दाखल होत असतानाही खरेदी, मोजणी व वाहतूक प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे गोंडपिपरीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी गोंडपिंपरी येथील बाजार समितीच्या आवारात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मालाची नोंदणी, प्रतवारी आणि खरेदी प्रक्रिया जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. हमीभाव योजनेतर्गत पात्र शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व प्रक्रिया पार पाडली जात आहे.

बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले की, यंदा अपेक्षेपेक्षा जास्त आवक झाल्यामुळे काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.मात्र त्यावर तत्काळ उपाययोजना करून खरेदी प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. वाहतूक व साठवणुकीसंदर्भातील आवश्यक नियोजनही करण्यात आले असून शेतकऱ्यांचा माल सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

शेतकऱ्यांच्या समस्या व सूचना जाणून घेण्यासाठी बाजार समिती प्रशासन नियमितपणे संवाद साधत असून कोणतीही तक्रार आल्यास तिचे तत्काळ निराकरण केले जात आहे. बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून भविष्यातही अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास सभापती इंद्रपाल धुडसे यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांनीही बाजार समितीकडून सुरू असलेल्या सुविधा व व्यवस्थापनाबाबत समाधान व्यक्त केले असून खरेदी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यामुळे परिसरातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये