ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आनंदवनाची महती शब्दांच्या पलीकडे _  गौतम भाई बजाज

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हृदस्पर्शी कार्यक्रम

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी.

राजेंद्र मर्दाने, वरोरा.

वरोरा : “सुन्दरे रामः, सुन्दरे सुन्दरी कथा… सुन्दरे किं न सुन्दरम्?” सुंदरकांडातील या ओळींचा संदर्भ देत, “इथे सुंदर नसलेले काय आहे? जसे सुंदरकांडातील प्रत्येक गोष्ट सुंदर आहे, तसेच बाबा आमटे यांनी उभारलेल्या आनंदवनातील सर्वच काही सुंदर आहे. आनंदवनाच्या कार्याची महती शब्दांच्या पलीकडे आहे,” असे गौरवोद्गार पवनार आश्रमाचे कार्यवाहक गौतमभाई बजाज यांनी काढले.

महारोगी सेवा समिती आनंदवन प्रकल्पाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्रद्धावन येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे होते. यावेळी सहसचिव डॉ. प्रकाश आमटे, डॉ. भारती आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे आवर्जून उपस्थित होते.

 *समूहशक्तीमुळेच यश शक्य*

गौतमभाई बजाज म्हणाले की, बाबा आमटे यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या कार्याला तोड नाही. १९५१ मध्ये विनोबा भावे आनंदवनात आले असताना मी त्यांच्यासोबत येथे आलो होतो. त्या वेळी माझे वय अवघे १३ वर्षे होते. त्या भेटीतील काही आठवणी आजही मनात ताज्या आहेत. आनंदवनाशी झालेल्या त्या परिचयाचा मला आयुष्यभर मोठा लाभ झाला.

ते पुढे म्हणाले की, आनंदवनाच्या उभारणीत बाबा आमटे, डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे यांचे जितके योगदान आहे, तितकेच योगदान साधनाताई आमटे, डॉ. भारती आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचेही आहे. कोणतेही मोठे कार्य एकट्याने घडत नाही. सामान्य माणसाचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असते. रामाला वानरांची, श्रीकृष्णाला गोप-गोपिकांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मावळ्यांची साथ लाभली. समूहशक्तीशिवाय कोणतेही मोठे कार्य यशस्वी होऊ शकत नाही. कुष्ठरुग्ण, दिव्यांग आणि सर्वसामान्यांना सोबत घेऊन बाबांनी ‘असाध्य ते साध्य’ करून दाखविले.

*बाबांच्या दूरदृष्टीमुळे आनंदवनाची भक्कम पायाभरणी*

डॉ. प्रकाश आमटे म्हणाले की, बाबा आणि साधनाताई हे एक अलौकिक जोडपे होते. बाबांच्या कार्यावर कोणतेही लेबल नव्हते; ते खऱ्या अर्थाने मानवतावादी होते. त्यांचा लोकसंग्रह अफाट होता. त्यांना जीव ओतून काम करणारे कार्यकर्ते लाभले. त्यांनी प्रत्येकामध्ये स्वाभिमान जागविला. अनेकांच्या सहभागातून आनंदवन उभे राहिले.

“बाबांच्या दूरदृष्टीला मर्यादा नव्हती. त्यांनी प्रकल्पाला दिलेले ‘आनंदवन’ हे नाव सार्थ ठरविले. त्यांच्या कार्याचा पाया इतका भक्कम होता की, आज आनंदवन ७५ वर्षांचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करू शकले आहे. दृढ इच्छाशक्ती असेल तर काय घडू शकते, याचे आनंदवन हे मूर्तिमंत उदाहरण आहे,” असे त्यांनी नमूद केले.

*७५ वर्षांच्या प्रवासाचा आढावा*

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आनंदवनाचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी आनंदवनाच्या ७५ वर्षांच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पे, सामाजिक उपक्रम आणि विविध घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, कुष्ठरुग्ण,दिव्यांग आणि वंचित घटकांना स्वाभिमानाने जगण्याची संधी देणारे आनंदवन सेवेतून उभे राहिलेले मानवतेचे विद्यापीठ आहे. बाबा आमटे यांच्या विचारांचा आणि समाजसेवेच्या परंपरेचा हा ७५ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास आजही समाजाला नवी दिशा देत आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अनाम वृक्ष आणि अनाम मूक कळ्यांच्या स्मरणशिलांवर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर वृक्षदिंडी काढण्यात आली. स्वरानंदवनच्या कलाकारांनी वृक्षगीते आणि भक्तिगीते सादर करून वातावरण भारावून टाकले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

*लेख, कविता आणि स्मृतींचा हृदस्पर्शी संगम*

यावेळी प्रा. मोक्षाला मनोहर, प्रा. तानाजी बारस्कर आणि डॉ. पल्लवी ताजने यांनी लेखवाचन केले, तर रावी आमटे हिने कविता सादर केली.

 डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते गौतमभाई बजाज यांचा आनंदवननिर्मित भेटवस्तू देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संधी निकेतनचे अधीक्षक रवींद्र नलगिंटवार यांनी , तर आभार प्रदर्शन डॉ. भारती आमटे यांनी केले.

कार्यक्रमाला महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सदाशिवराव ताजने, डॉ. विजय पोळ, माधव कविश्वर, पल्लवी आमटे, अनिकेत आमटे, आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोद्दार, सामाजिक कार्यकर्ते राजेश ताजने, दीपक शिव, तसेच आनंदवन व हेमलकसा येथील कार्यकर्ते, कुष्ठमुक्त नागरिक, दिव्यांग, महिला, पुरुष आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता “शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई, दु:ख उधळावयास आता आसवांना वेळ नाही..” या प्रेरणादायी गीताने झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये