प्रेरणा महाविद्यालयात “स्वच्छता ही सेवा” अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती:- राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथे करण्यात आले. २५ सप्टेंबरला प्रथम सत्रात युगचेतना बहुउद्देशीय ग्रामविकास संस्थाचे उपाध्यक्ष अरविंद मुसने यांच्या हस्ते उपस्थित स्वयंसेवकांना स्वच्छतेवर शपथ देण्यात आली.
द्वितीय सत्रात “मेरा युवा भारत पोर्टल व स्वच्छता ही सेवा” या उपक्रमात घेण्यात येणारे कार्यक्रम या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून रमेश राठोड उपस्थित होते. व्याख्यानात माय भारत पोर्टलचे महत्व व विद्यार्थ्यांना पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन रमेश राठोड यांनी केले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी केले. यानंतर स्वच्छता ही सेवा योजने अंतर्गत उपक्रम राबवण्यात आला.
यामध्ये महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी शहरातील बस स्थानक, बाजार पेठ इत्यादी ठिकाणांमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा, प्लास्टिक बॉटलचे संकलन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. एकता गेडाम, प्रा. प्रशांत सरकार, प्रा. पल्लवी एकरे यांनी केले. या उपक्रमासाठी गटप्रमुख वैभव ताजने, मुलींची गटप्रमुख साक्षी डाखरे आदींनी परिश्रम घेतले. स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत शहरातील विविध ठिकाणांवर उपस्थित असलेल्या नागरिकांना महाविद्यालयीन विध्यार्थ्यानी स्वछतेचे महत्व समजावून सांगितले.



