ताज्या घडामोडी

धार्मिक उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा – आयुष नोपानी

यंदाचा गणेशोत्सव सालाबादप्रमाणे शांततेत साजरा करा - प्रशासनाचे जनतेला आवाहन

चांदा ब्लास्ट :*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : यंदाचा गणेशोत्सव १९ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. हा उत्सव सर्वांचा असून तो शांततेत व आनंदात पार पाडण्यासाठी, सामाजिक सौहार्द राखण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. धार्मिक उत्सवात कायदा व सुव्यवस्था जपण्यासाठी सर्वांनी अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करुन प्रशासनाला यथोचित सहकार्य करावे, असे आवाहन सहा. पोलीस अधीक्षक तथा वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी ( भा.पो.से.) यांनी येथे केले. आगामी ‘ गणेशोत्सव ‘ व ‘ ईद मिलाद- उन- नबी ‘ उत्सव निर्विघ्नपणे व शांततेत पार पडावेत, यासाठी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात गणेश मंडळ, शातंता कमेटीचे सदस्य, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
मंचावर परिविक्षाधीन पोलीस उप- अधीक्षक विशाल नाजरगोजे, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, नायब तहसीलदार लोखंडे, महावितरण कंपनीचे अभियंता रामटेके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, न.प.चे स्वच्छता निरीक्षक भूषण सालवटकर उपस्थित होते.
नोपानी पुढे म्हणाले की, गणेशोत्सव साजरा करताना निवासी क्षेत्रात ध्वनीचा अतिरेक टाळावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजेचा वापर करण्यास बंदी असल्याने त्याचा वापर सार्वजनिक गणेशोत्सवात करता येणार नाही. आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई होणारच, असे त्यांनी निक्षून सांगितले. सर्व मंडळांनी मंडपाच्या समोरील बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सक्त सूचनाही त्यांनी दिल्या. बॅनर, पोस्टर, पताका, आपत्तीजनक देखाव्यांच्या माध्यमातून कोणाचीही धार्मिक भावना दुखावणार नाही ,याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. नियमांची पायमल्ली केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
‘ अनंत चतुर्दशी ‘ आणि ‘ ईद मिलाद- उन – नबी ‘ उत्सव २८ सप्टेंबर रोजी साजरे होणार आहेत. निर्विघ्नपणे, उत्साहात हे सण साजरे व्हावेत, उत्सवाला गालबोट लागू नये , यासाठी शहरात २८ ऐवजी ३० सप्टेंबरला गणेश विसर्जन करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावर गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी, शांतता कमेटीतील सदस्यांनी योग्य सूचनांसह सकारात्मक चर्चा केली.
तत्पूर्वी पोलीस प्रशासनातर्फे गोपनीय विभाग प्रमुख राजेश वऱ्हाडे यांनी गणेश मंडळांना मार्गदर्शन सूचना दिल्या. त्यात गणेश मंडळांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह परवानगी घ्यावी, पावसाची स्थिती पाहता गणेश मंडळांनी शार्ट सर्किट होणार नाही , मंडप उभारताना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी शिवाय गणेशोत्सव काळात वर्गणीसाठी कोणावरही जबरदस्ती करू नये,असे त्यांनी निक्षून सांगितले.गणेश मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, अशोभनीय संगीत वाजवू नये, इत्यादी महत्वपूर्ण सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते खेमराज कुरेकार, छोटुभाई शेख, माजी नगरसेवक राजेंद्र मर्दाने, जेष्ठ नागरिक संघाचे मारोतराव मगरे, सामाजिक कार्यकर्ते विलास नेरकर, आसिफ रजा, नितेश जयस्वाल, राहुल डोंगरावर, मधुसूदन टिपले, अमित चवले, त्रिशूळ घाटे, गणेश मंडळाचे पदाधिकारी, स्वंयसेवी संस्थेचे पदाधिकारी, पत्रकार व अन्य मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती.
प्रास्ताविकात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी तालुक्यातील व शहरातील गणेश मंडळाची माहिती दिली. यंदाचा गणेशोत्सव सालाबादप्रमाणेच शातंतेत साजरा करा, असे आवाहन केले.
सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल धनपाल मेश्राम, दीपक मोडक, दिनेश मेश्राम, सूरज मेश्राम इ.नी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये