ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वाधारमध्ये चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे रक्षाबंधन

तसेच, पीडित महिलांचा आधार बनून अडचणीत सहकार्य करण्याचे दिले अभिवचन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : देशभरात बहीण- भावाचा पवित्र सण रक्षाबंधन साजरा केला जातो. मात्र दुर्दैवाने घरगुती हिंसाचार व इतर कारणांमुळे एकाकी पडलेल्या बहिणींना या दिवशीही भावाचे प्रेम मिळत नाही. अशा भगिनींना भविष्यातील अडचणीत सहकार्य करण्याचे आश्वासन देत चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे स्वाधार गृहात रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला.

चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डाॅ. गोपाल मुंधडा यांच्या अध्यक्षतेखाली ३० ऑगस्ट रोजी ॲड. विद्या बांगडे यांच्या संस्थेद्वारे संचालित कृष्ण नगर परिसरातील स्वाधार गृह, महिला आश्रयस्थान, वसतिगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे नियोजन ॲड. आशिष मुंधडा यांनी केले होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ॲड. इतिका शहा, ॲड. शमा पठाण, ॲड. रुपाली खोब्रागडे, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे सचिव जितेंद्र चोरडिया, वनश्री मेश्राम, सपना नामपल्लीवार, दिनेश जुमडे, कपिश उसगावकर, सुविद्या बांबोळे यांची उपस्थिती होती. घरगुती हिंसाचारात बळी पडलेल्या, पालकांद्वारे किंवा पतीद्वारे सोडण्यात आलेल्या, घरातील मानसिक त्रासाच्या बळी पडलेल्या व अनाथ महिला संघर्षाचे जीवन जगत आहेत. अशा महिलांनाही रक्षाबंधन सणानिमित्त भावाचे प्रेम मिळावे, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथींनी या कार्यक्रमाचे कौतुक करुन असे समाजपयोगी कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचे सांगितले.

तर चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित महिलांचा आधार बनून अडचणीत सहकार्य करण्याचे अभिवचन यावेळी दिले. स्वाधारगृहातील भगिनींनी औक्षवण करुन सर्वांना राखी बांधली. तर सीबीएसएसकडून रक्षाबंधननिमित्त भेट देण्यात आली. यावेळी स्वाधारचे व्यवस्थापक घनश्याम कामटकर, अधीक्षिका इंदुताई चवरे, शारदा चट्टे, विधी सल्लागार प्रियतमा खातखेडे, काळजीवाहक सगुण पलप यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये