कर्नाटका एम्टा खाण प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्यासाठी १४ नोव्हेंबर पासून महिलांचा उपोषणाद्वारे एल्गार
जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे
कर्नाटका खुल्या कोळसा खाणीकरिता संपादित केलेल्या परिसरातील बरांज गावाचे पुन:र्वसन तसेच उर्वरित शेत जमिनीचे अजून पर्यंत संपादन न केल्यामुळे खाण परिसरातच महिला उपोषणास बसणार आहे.
दि.१४ डिसेंबर पासून १० दिवस साखळी उपोषण करण्यात येणार असून न्याय न मिळाल्यास त्यानंतर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. खाणीतील प्रकल्पग्रस्त बरांज मोकासा गावातील महिलांनी एकत्र येऊन खालील ठराव घेतला. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१४ मध्ये ही खाण बंद झाली. नंतर ती सन २०२० ला सुरू झाली. परंतु खाण बंद असताना १५ सप्टेंबर २०१६ ला करारपत्र झाले त्यात प्रकल्पग्रस्तांना अत्यल्प मोबदला देण्याची तरतूद केली आहे. सदर करार मान्य नसल्याचे या सभेत ठरविले. तो करार रद्द करून नवीन करार करा असे सभेत ठरविण्यात आले. तसेच गावाचे पुनर्वसन प्रकल्पग्रस्त गावापासून आठ किलोमीटर अंतरावर नागपूर – चंद्रपूर मार्गावर करणे, पुनर्वसन करताना ज्यांना प्लॉट नको त्यांना १५ लाख रुपये देण्यात यावे, नोकरी ऐवजी १५ लाख रुपये अनुदान द्यावे, नोकरी करू इच्छिणाऱ्या प्रकल्पग्रसस्तांना कर्नाटका पावर कार्पोरेशन लिमिटेड कंपनीत कायमस्वरूपी नोकरी, वेकोलीच्या वेतनानुसार वेतन, गावातील १२६९ घरांचे भूसंपादन, प्रकल्पग्रस्त आदिवासींना पाच एकर शेती, घर यासह इतर मागण्यांचा या ठरावात समावेश आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेला खाणीतील स्पोटामुळे तडे गेले आहे, त्यात काही दुर्घटना घडल्यास कंपनी आणि प्रशासन जबाबदार राहणार असेही ठरावात म्हटले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून निवेदने देऊन आणि आंदोलने करून आश्वासना व्यतिरिक्त काहीच मिळाले नसल्याने अखेर हा पवित्र घ्यावा लागत असल्याचे उपोषणास बसणाऱ्या महिला पंचशीला कांबळे,पल्लवी कोरडे,ज्योती पाटील,मीरा देहारकर माधुरी निखाडे, माधुरी वाढई यांचेसह इतर महिलांनी सांगितले. सदर निवेदन जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे .



