ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार प्रा. विजय मुडे ‘कर्मवीर पुरस्काराने’ सन्मानित

श्रमिक पत्रकार संघ चंद्रपुरतर्फे सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

पत्रकारितेतील निष्ठा, अखंड ध्येयवाद आणि निरलस समाजसेवेचा वसा आयुष्यभर जोपासणाऱ्या ब्रह्मपुरी येथील ‘दैनिक हितवाद’चे तालुका प्रतिनिधी तथा अर्धसाप्ताहिक ‘ब्रह्मपुरी समाचार’ वृत्तपत्राचे व्यवस्थापक, ज्येष्ठ पत्रकार प्रा. विजय मुडे यांना चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे मानाचा ‘कर्मवीर पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ कार्यालयात पार पडलेल्या ‘दिपावली स्नेह मिलन कार्यक्रम तथा कर्मवीर पुरस्कार व उत्कृष्ट वृत्तांत स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळ्यात’ हा सन्मान अतिशय उत्साहात पार पडला.

१४ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून मनपाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा तथा जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा मनस्वी संदीप गिऱ्हे प्रामुख्याने उपस्थित होत्या. चंद्रपूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर व सचिव प्रवीण बदकी यांच्या उपस्थितीत प्रा. विजय मुडे यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना मान्यवरांनी प्रा. विजय मुडे यांच्या पत्रकारितेतील निष्कलंक प्रवासाचा आणि निर्भीड बाण्याचा गौरव केला. सत्ताधाऱ्यांच्या चुकांवर परखडपणे भाष्य करत नेहमीच सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली. हा पुरस्कार आपल्या पुढील प्रवासासाठी अधिक ऊर्जा देणारा ठरेल, असे मनोगत प्रा. विजय मुडे यांनी व्यक्त केले. या दिमाखदार सोहळ्याला जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये