ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक शौचालय दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात विशेष अभियान

अभियानाची प्रत्येक गावात प्रभावी अंमलबजावणी करा– पुलकित सिंह

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ ग्रामीण भागातील स्वच्छता, आरोग्य आणि नागरिकांचे सन्मानपूर्वक जीवनमान उंचावण्यासाठी जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात ‘स्वच्छ शौचालय – गरिमामय भविष्य’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या निर्देशानुसार १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक गावाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

जागतिक शौचालय दिन २०२६ ची संकल्पना ‘सुरक्षित शौचालये, समान भविष्य’ (Safe Toilets, Equal Futures) अशी असून, स्वच्छता आणि स्त्री-पुरुष समानता यांचा परस्परसंबंध अधोरेखित करण्यात आला आहे. महिलांचे आरोग्य, मुलींची सुरक्षितता, शालेय विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या गरजा तसेच दिव्यांग व्यक्तींना सुलभ स्वच्छतागृहांची उपलब्धता यावर या अभियानात विशेष भर देण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या कार्यक्षमतेचे आणि स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. शौचालयांमधील पाणी, वीज, नळ, कमोड, दरवाजे, स्वच्छता आणि हात धुण्याच्या सुविधांची उपलब्धता तपासली जाणार आहे. आवश्यकतेनुसार दुरुस्ती, देखभाल, नूतनीकरण आणि सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात येतील. तसेच शाळा, अंगणवाडी केंद्रे आणि ग्रामपंचायत कार्यालयांमधील संस्थात्मक शौचालयांचीही तपासणी करण्यात येणार आहे. गावातील शौचालयांची व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी एक खड्डा शौचालयाचे दोन खड्ड्यांच्या शौचालयात रूपांतर, सेप्टिक टँक व मैला गाळ व्यवस्थापन (FSM) नियमांचे पालन, तसेच आवश्यकतेनुसार यांत्रिक पद्धतीने गाळ उपसण्याचे नियोजन केले जाणार आहे. वैयक्तिक घरगुती शौचालयांची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठीही कुटुंबांना प्रोत्साहित केले जाणार आहे.

ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती आणि लोकसहभागाला प्राधान्य

अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत, ग्राम पाणी व स्वच्छता समिती, बचत गट, स्वयंसेवी संस्था, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी सेविका, स्वच्छताग्रही आणि ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छता, हात धुण्याच्या सवयी आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६, कचऱ्याचे वर्गीकरण, सुरक्षित विल्हेवाट आणि मैला गाळ व्यवस्थापनाबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांचा आणि शौचालयांचा होणार गौरव

या अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची तसेच वैयक्तिक घरगुती शौचालयांची निवड करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर उत्कृष्ट शौचालयांची निवड, त्यानंतर तालुका व जिल्हास्तरावर अंतिम निवड अशी स्पर्धात्मक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. १० डिसेंबर रोजी अभियानाच्या समारोपप्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांचा, संस्थांचा आणि लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

स्वच्छ सेवा आकलन (SSA) प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींनी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत ते पूर्ण करावे, तसेच अभियानातील सर्व कामांची माहिती SBM(G) IMIS प्रणालीवर नियमितपणे नोंदवावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

प्रत्येक गाव स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनविण्याचा संकल्प!

स्वच्छता ही केवळ एका दिवसाची किंवा एका अभियानापुरती मर्यादित बाब नसून ती प्रत्येक नागरिकाच्या जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे. सार्वजनिक शौचालयांची योग्य देखभाल, महिलांसाठी सुरक्षित सुविधा, दिव्यांगांसाठी सुलभ शौचालये आणि गावातील स्वच्छतेचे सातत्यपूर्ण संवर्धन यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने अभियानाचे नियोजन करून लोकसहभागातून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. प्रत्येक गाव स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी प्रशासनासोबत ग्रामस्थांनीही जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये