ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूरच्या ‘श्वास’ असलेल्या रामबाग मैदानाच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी

ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य जपत रामबाग मैदानाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले आणि चंद्रपूरकरांच्या जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे ऐतिहासिक रामबाग मैदान हे शहराचे एक महत्त्वाचे खुले व नैसर्गिक ठिकाण आहे. या मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

              रामबाग मैदान हे केवळ खेळाचे मैदान नसून चंद्रपूरकरांसाठी मोकळा श्वास घेण्याचे हक्काचे ठिकाण आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मैदानाशी अनेक पिढ्यांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. सकाळी आणि सायंकाळी व्यायामासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक, खेळाचा सराव करणारे खेळाडू, युवक तसेच परिसरातील नागरिकांसाठी हे मैदान महत्त्वाचे केंद्र बनले आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि बदलती जीवनशैली लक्षात घेता अशा मोकळ्या जागांचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक असल्याचे आमदार जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले.

   रामबाग मैदानाचा विकास करताना त्याचे ऐतिहासिक महत्त्व, नैसर्गिक सौंदर्य आणि मूळ स्वरूप कायम राखण्याला प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिका आमदार किशोर जोरगेवार यांनी मांडली. मैदानाच्या परिसरात नागरिकांसाठी आवश्यक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा व व्यायामासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, खेळाडूंना सरावासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देणे तसेच मैदान अधिक सुशोभित आणि सुव्यवस्थित करणे, या दृष्टीने विकासाचे नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी सांगितली.

            शहराच्या विकासात रस्ते, इमारती आणि पायाभूत सुविधांइतकेच महत्त्व सार्वजनिक मोकळ्या जागांचेही आहे. नागरिकांना आरोग्यदायी वातावरण मिळावे, मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध व्हावी आणि पुढील पिढ्यांसाठी शहरातील नैसर्गिक ठेवा जतन व्हावा, या उद्देशाने रामबाग मैदानाचा विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे या कामासाठी शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी केली.

            रामबाग मैदान हे चंद्रपूरच्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या मैदानाचे मूळ सौंदर्य अबाधित ठेवत आधुनिक सुविधांनी युक्त असे स्वरूप देण्यासाठी आपण कटिबद्ध असून, चंद्रपूरकरांच्या भावनांशी जोडलेल्या या महत्त्वपूर्ण ठिकाणाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये