ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोहिणी वेलेकर यांची सुवर्णभरारी : राज्यपाल, मुख्यमंत्री व कुलगुरूंच्या हस्ते गौरव

गोंडवाना विद्यापीठाच्या चौदाव्या दीक्षांत समारंभात सुवर्णपदकाने सन्मानित

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर:- शैक्षणिक क्षेत्रात आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत राजुरा येथील रोहिणी वसंत वेलेकर हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे आयोजित चौदाव्या दीक्षांत समारंभात तिला मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे राजुरा शहरासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.

     शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये गोंडवाना विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स (M.Lib.I.Sc.) या पदव्युत्तर अभ्यासक्रमात रोहिणी वेलेकर यांनी उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी केली. त्यांच्या गुणवत्तापूर्ण यशाची दखल घेत त्यांना डी.पी.एस. जी. कुमार ग्रंथालय प्रतिष्ठान सुवर्णपदक जाहीर करण्यात आले होते.

     रविवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे पार पडलेल्या विद्यापीठाच्या चौदाव्या दीक्षांत समारंभात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते रोहिणी वेलेकर यांना सुवर्णपदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

    सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथील विद्यार्थिनी असलेल्या रोहिणी यांनी मेहनत, जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या बळावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाचा नावलौकिक उंचावला असून राजुरा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते याचे उत्तम उदाहरण रोहिणी वेलेकर हिने आपल्या यशातून दाखवून दिले आहे. तिची ही सुवर्णभरारी निश्चितच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये