ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोहित पठारे हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्या!

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

गोंडपिपरी :_ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे बौद्ध समाजातील आंबेडकरी कार्यकर्ते रोहित पठारे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ तसेच या अमानुष घटनेतील सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनाद्वारे रोहित पठारे यांच्यावर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. एका निष्पाप व्यक्तीला घरातून बाहेर काढून मारहाण करणे, चौकाचौकांतून फरफटत नेणे, त्याच्या कुटुंबीयांसमोर अमानवी वागणूक देणे, पत्नीला मारहाण करणे आणि तहानलेल्या अवस्थेत त्याच्या तोंडात लघवी करण्यासारखे अत्यंत संतापजनक कृत्य करून अखेर त्याची हत्या करणे, ही केवळ एका व्यक्तीवरील हिंसा नसून माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. अशा प्रकारची वागणूक मनुस्मृतीवादी आणि जातीय मानसिकतेचे विदारक दर्शन घडविणारी आहे.

या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांकडून झालेल्या कथित दिरंगाईबाबतही निवेदनातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आंबेडकरी समाज, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग आणि विविध सामाजिक संघटनांनी आवाज उठविल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, केवळ आरोपींना अटक करून चालणार नाही, तर या प्रकरणाचा तपास निष्पक्ष, पारदर्शक आणि जलदगतीने पूर्ण करून सर्व दोषींना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी मांडली.

*निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :*

*रोहित पठारे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.

*या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व वेगाने पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करावे.

*प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावी.

*पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी सक्षम व विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी.

*दोषींना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा, तसेच पुराव्यांनुसार फाशीची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयासमोर मांडावी.

*पीडित कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत, कुटुंबातील पात्र सदस्याला शासकीय नोकरी आणि आवश्यक संरक्षण देण्यात यावे.

*राज्यात जातीय अत्याचार व सामाजिक विषमता निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.

यावेळी बोलताना डॉ. अनिरुद्ध वनकर म्हणाले की, “महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची भूमी आहे. या भूमीत जात आणि धर्माच्या नावावर कोणत्याही माणसाची हत्या होणे, कोणालाही अमानवी वागणूक दिली जाणे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा, सन्मानाने जगण्याचा आणि न्यायाचा अधिकार दिला आहे. रोहित पठारे यांना न्याय मिळवून देणे ही केवळ एका कुटुंबाची मागणी नसून संपूर्ण समाजाची आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. महाराष्ट्रात जातीय द्वेषाला नव्हे, तर समता, बंधुता आणि मानवतेला स्थान मिळाले पाहिजे.”

या निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पवन भगत, शहर जिल्हाध्यक्ष सुनीता गोवर्धन, राज्य महासचिव प्रतीक बनकर, राज्य महासचिव गौरव नागदेवते, राज्य सचिव ॲड. सचिन फुलझेले, सोमेश्वर, राज्य कार्यकारिणी सदस्य कमलेश निमगडे, संकेत रायपुरे शहर महासचिव, राजू सोधारी उपाध्यक्ष शहर, संघशील शहारे सचिव शहर, रेखाताई बारसागडे शहर उपाध्यक्ष, राजू गोवर्धन सामाजिक नेते, कपिल मते, उज्वला नगराळे यांच्यासह चंद्रपूर शहरातील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये