गेवरा बुज येथे चाळीस वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
दीड वर्षातील परिसरातील सातवी घटना; व्यसनाधीनता आणि ऑनलाइन सट्ट्यामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :_ पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेवरा बुज, रामनगर येथे एका चाळीस वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी सात चे सुमारास उघडकीस आली आहे. चंदू तुळशीराम कोसमशिले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असुन, गेल्या दीड वर्षातील या परिसरातील ही सातवी आत्महत्येची घटना असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेवरा बुज येथील रामनगर भागात राहणारे चंदू तुळशीराम कोसमशिले (वय ४०) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पाथरी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पाथरी पोलीस करत आहेत.
गावकऱ्यांमध्ये व्यसनाधीनता आणि सट्ट्याची चर्चा
परिसरात गेल्या दीड वर्षात तब्बल सात जणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनांमागील नेमके कारण अद्याप पोलीस तपासात समोर आले नसले, तरी गावातील नागरिकांमध्ये मात्र याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. रामनगर येथे सर्रास सुरू असलेली सहज उपलब्ध होणारी अवैद्य दारुमुळे वाढलेले दारूचे व्यसन, ऑनलाइन सट्टयाचा विळखा आणि त्यातून होणाऱ्या आर्थिक नुकसानीमुळे वाढणारे कौटुंबिक कलह हीच या आत्महत्या मागील प्रमुख कारणे असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहेत. प्रशासनाने या अवैध धंद्यांवर आणि व्यसनाधीनतेवर कठोर कारवाई करून तरुण व मध्यमवयीन पिढीला या संकटातून वाचवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



