ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आयुष्याच्या “हाफ सेंच्युरी”त भरली माजी विद्यार्थ्यांची एक दिवसीय शाळा

विठ्ठलवाड्यात २७ वर्षांनंतर जुळले मैत्रीचे बंध ; निरोपाच्या क्षणी अश्रूंनी दाटले डोळे!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ सहजपणे सुख_दुःखात आयुष्य जगत असताना, याच आयुष्याच्या हाफ सेंच्युरीत विठ्ठलवाडा येथे माजी विद्यार्थ्यांची एक दिवसीय शाळा भरली. निमित्त होते माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन सोहळ्याचे. तब्बल २७ वर्षांनंतर मित्र-मैत्रिणींची पुन्हा भेट झाली. शिवाजी हायस्कूल, विठ्ठलवाडा येथे माजी विद्यार्थ्यांची एक दिवसीय शाळा, जुन्या गुरुजनांचे मार्गदर्शन, बालपणीच्या आठवणींना उजाळा आणि निरोपाच्या क्षणी दाटून आलेले अश्रू अशा भावनिक वातावरणात इयत्ता दहावीच्या १९९८-९९ बॅचचा स्नेहमिलन सोहळा गुरुवारी (दि.१२) उत्साहात पार पडला.

स्नेहमिलनाची संकल्पना माजी विद्यार्थिनी जयश्री राव (राजूरकर) हिने मांडली. तिच्या पुढाकाराला प्रतिसाद देत विखुरलेले वर्गमित्र-मैत्रिणी एकत्र आले. सर्वांनी सामूहिक खर्च उचलत पुन्हा विद्यार्थी होण्याचा आनंद अनुभवला. प्रास्ताविकातून जयश्रीने जुन्या मैत्रीचे बंध दृढ करण्यासह एकमेकांच्या कुटुंबीयांची ओळख आणि सुख-दुःखात परस्परांना आधार देण्याचा हेतू स्पष्ट केला.

कार्यक्रमात माजी प्राचार्य तथा मुख्याध्यापक लांडे, प्रा. शंभू येलेकर, दुर्योधन, निब्रड, गायकवाड, डांगे, पोटे, खामकर, शेंडे, दिवसे तसेच शिपाई सुरेश वाग्दरकर यांचा सन्मान करण्यात आला. काही शिक्षक सपत्नीक उपस्थित होते. शिक्षकांनी जुन्या आठवणी सांगितल्या, तर विद्यार्थ्यांनी स्वतःसह कुटुंबीयांचा परिचय करून दिला.

गुरुजनांच्या प्रत्येक ‘पिरियड’ला माजी विद्यार्थ्यांनी पूर्णवेळ उपस्थिती लावत पुन्हा शाळकरी जीवन अनुभवले. कार्यक्रमाचे संचालन किशोर मडावी यांनी केले. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना मानचिन्ह व भेटवस्तू देण्यात आल्या. दिवाळीनिमित्त पेढ्यांचे वाटप, तर चिमुकल्यांना चॉकलेट देण्यात आले. दूरवरून आलेल्या मित्र-मैत्रिणींनी एकमेकांची आस्थेने विचारपूस करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

आयोजनासाठी अनुराधा मल्लेरवार, सीमा पिंपळकर, विजया श्रीकोंडावार, जयश्री जंम्पलवार, अल्का वाग्दरकर, दयाल कुकुडकर, संजय पिंपळकर, रमेश वाग्दरकर, प्रदीप पोतराजे व गौतम अवथरे यांनी परिश्रम घेतले. शेवटी जयश्री राव हिने सर्व गुरुजन, माजी विद्यार्थी व कुटुंबीयांचे आभार मानले.

स्नेहभोजनानंतर निरोप घेताना अनेकांचे डोळे पाणावले. बालपणीच्या वर्गखोल्या आणि आठवणी मागे सोडताना प्रत्येकाचे मन भरून आले. हा सोहळा मैत्री, गुरुजनांप्रती कृतज्ञता आणि पुन्हा जगलेल्या बालपणाचा अविस्मरणीय उत्सव ठरला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये