उत्साही युवक मंडळाकडून कला, क्रीडा अन् मनोरंजनाचा त्रिवेणी संगम!
कबड्डी स्पर्धेसह गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी व मान्यवरांचा गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ कला, क्रीडा आणि मनोरंजन या त्रिसूत्रीचा संगम साधत उत्साही युवक मंडळ, तोहोगाव यांच्या वतीने गेल्या ४४ वर्षांपासून दिवाळीच्या पर्वावर अखंडितपणे कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यंदाही विविध क्रीडा स्पर्धांसह विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा, उच्च शिक्षणासाठी निवड झालेल्या गुणवंतांचा तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
तोहोगाव परिसरातील विविध विभागांतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच एमबीबीएस, बीएएमएस, बी.ई. यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शेतकरी आघाडी बंडू गौरकार आणि गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबुराव बोंडे यांचा मंडळातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
कबड्डी स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग नोंदविला. ६२ किलो वजन गटात उत्साही युवक मंडळ, तोहोगाव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक किल्हा हनुमान क्रीडा मंडळ, सोनुर्ली तर तृतीय क्रमांक श्रीराम आखाडा क्रीडा मंडळ, लाठी यांनी मिळविला. १८ वर्षांखालील गटात श्रीराम आखाडा क्रीडा मंडळ, लाठी यांनी प्रथम तर किल्हा हनुमान क्रीडा मंडळ, सोनुर्ली यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.
बक्षीस वितरण व सत्कार समारंभासाठी मंचावर आमदार देवराव भोंगळे, कोठारीचे ठाणेदार दीपक कोक्रेटवार, इंगळे साहेब, बंडू गौरकार, उत्साही युवक मंडळाचे अध्यक्ष वसंत मोरे, बाबुराव बोंडे, विजय बोपनवार, अभय कासनगोटूवार, अतुल कासनगोटूवार आणि मदन खाडे उपस्थित होते. मागील ४४ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा केवळ क्रीडा स्पर्धांपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, गुणवंतांचा गौरव आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम ठरत आहे


