ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“गडचांदूर–धानोरा मार्गावर मृत्यूची वर्दळ! ;  रस्ता की मृत्यूचा सापळा?

अरुंद रस्ता, अवजड वाहने आणि बेशिस्त वाहतुकीमुळे नागरिक भयभीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

वाहतूक व्यवस्थेचा अभाव; डिव्हायडरची मागणी

 गडचांदूर–धानोरा मार्ग सध्या प्रवाशांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.अरुंद रस्ता आणि त्यावर दिवसरात्र सुरू असलेली अवजड वाहनांची मोठी वर्दळ यामुळे या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे.

             परिसरातील चार सिमेंट कंपन्यांशी संबंधित मालवाहतूक तसेच केएफटी ट्रान्सपोर्टच्या लखमापूर येथील लाइमस्टोन माईन्समधून होणारी वाहतूक याच मार्गाने होत असल्याने रस्त्यावर मोठ्या वाहनांची सतत ये-जा सुरू असते. अरुंद रस्त्यावर अवजड वाहनांची वाढती संख्या, वेगवान वाहतूक आणि रस्त्याच्या कडेला होणारे अवैध पार्किंग यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

       मागील वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या रेती उत्खननामुळे नदीपात्राचे नुकसान झाल्याची तक्रार असून, आजही हायवा व ट्रॅक्टरमधून दिवस-रात्र रेती वाहतूक सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गावरील विविध अपघातांत काहींना जीव गमवावा लागला, तर काही जण गंभीर जखमी होऊन कायमचे अपंग झाल्याची वेदनादायी परिस्थिती आहे.

    स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या चिंतेनुसार, काही वाहनचालक मद्यप्राशन करून वाहने चालवत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. गडचांदूर येथून मार्गस्थ होताना तसेच धानोरा परिसरातून निघताना काही चालकांकडून देशी दारूचे सेवन केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या गंभीर आरोपांची संबंधित प्रशासनाने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

       या मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी पुरेसे ट्रॅफिक पोलीस कर्मचारी नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अवजड वाहनांची वाढती वर्दळ, बेशिस्त पार्किंग आणि अपुऱ्या वाहतूक नियंत्रणामुळे आतापर्यंत अनेकांना अपघातात जीव गमवावा लागल्याची खंतही व्यक्त केली जात आहे.

१० नोव्हेंबर रोजी लखमापूर येथे झालेल्या भीषण अपघातात गणेश थिपे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तरी प्रशासनाने या मार्गावरील ओव्हरलोड वाहतुकीची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी. नियमित वाहतूक पोलिस, अवैध पार्किंगवर कारवाई करावी व वाहनचालकांची नियमित मद्यपान तपासणी करावी रस्ता रुंदीकरण तसेच तातडीने डिव्हायडर उभारावा,“आणखी किती निष्पाप बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

          हरिदास थिपे,सामाजिक कार्यकर्ते लखमापूर

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये