महापांढरवाणीचा आदर्श घेण्यासाठी इतर गाव सरसावली!
वृक्षारोपण, बांबू लागवड, श्रमदान व सामूहिक वनहक्क व्यवस्थापनाची पाहणी; ग्रामसभेच्या लोकसहभागाचे कौतुक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिवती तालुक्यातील गडपांढरवाणी, काकबन, आसापूर, घारपणा, धनकदेवी व भुरियेसापूर येथील ग्रामस्थांनी महापांढरवाणी गावाला भेट देत ग्रामसभेच्या लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. वृक्षारोपण, बांबू लागवड, श्रमदान तसेच नैसर्गिक साधनसंपत्ती संवर्धन आणि सामूहिक वनहक्क व्यवस्थापनाच्या उपक्रमांची माहिती घेत ग्रामस्थांनी आपल्या गावातही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
महापांढरवाणी येथे आगमन झालेल्या ग्रामस्थांचे सरपंच जंगूजी कोटनाके, सामूहिक वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन आत्राम, तसेच इसरू आळे, अनिल आळे, बादू आर्डे, तुकाराम धुर्वे यांच्यासह ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी महापांढरवाणी ग्रामस्थांनी गावातील विकासकामांचे नियोजन, ग्रामसभेची भूमिका, लोकसहभाग आणि श्रमदानातून झालेल्या कामांची माहिती दिली.
ग्रामसभेच्या एकजुटीतून गावाचा विकास कसा साधता येतो, याचा प्रत्यक्ष अनुभव या भेटीतून पाहुण्या ग्रामस्थांना मिळाला. महापांढरवाणी ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक करत उपस्थितांनी आपल्या गावातही वृक्षारोपण, बांबू लागवड, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि श्रमदानाचे उपक्रम राबविण्याची प्रेरणा घेतली.
या अभ्यासभेटीचे नियोजन फाऊंडेशन फॉर इकोलॉजिकल सिक्युरिटी (FES) यांच्या वतीने संतोष पंडित व वैभव दोंगडे यांनी केले. यावेळी गावविकास, ग्रामसभा बळकटीकरण, लोकसहभाग आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
येरमीसापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सोयाम यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना, “एकत्र येऊया, संघटित होऊया आणि गाव सुजलाम्-सुफलाम् करूया,” असे आवाहन केले.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या १२ सप्टेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयाची प्रत संबंधित ग्रामस्थांना वितरित करण्यात आली. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क कायदा २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ अंतर्गत सामूहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तसेच कन्वर्जन्स समित्यांच्या कार्याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.
महापांढरवाणी ग्रामस्थांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी FES च्या वतीने मेंढा लेखा ग्रामसभेची एकदिवसीय अभ्यासभेट स्वतःच्या खर्चाने आयोजित करून देण्याची ग्वाही देण्यात आली. तसेच उपस्थित ग्रामस्थांना आवश्यक साहित्य देऊन प्रोत्साहन देण्यात आले. या उपक्रमासाठी संतोष सलाम व सित्रु गेडाम यांचे विशेष सहकार्य लाभले.
*ग्रामसभेच्या एकजुटीचा संदेश*
महापांढरवाणी ग्रामसभेने लोकसहभाग, श्रमदान आणि सामूहिक नियोजनाच्या माध्यमातून उभा केलेला विकासाचा आदर्श परिसरातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गावाच्या विकासासाठी केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वतः पुढाकार घेतल्यास गावाच्या नैसर्गिक व मानवी संसाधनांचा प्रभावी वापर करता येतो, हा संदेश या अभ्यासभेटीतून अधोरेखित झाला.



