ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पदवीधर निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा रंगणार सामना

अभिजित वंजारी यांचा भद्रावतीत मतदारांशी संवाद : विविध राजकीय पक्ष व शिक्षक संघटनांचा पाठिंबा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित गोविंदराव वंजारी यांनी भद्रावती येथे पदवीधर मतदारांशी संवाद साधत प्रचाराला वेग दिला. एका उमेदवाराने माघार घेतल्याने आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वंजारी यांच्या प्रचाराला विविध राजकीय पक्ष, शिक्षक संघटना आणि पदवीधर मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

स्वागत सेलिब्रेशन हॉल येथे आयोजित संवादसभेला उमेदवार अभिजित वंजारी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, काँग्रेसचे युवा नेते प्रवीण काकडे, तालुकाध्यक्ष सुमित मुडेवार, शहराध्यक्ष भूपेश कायरकर, वरोरा अध्यक्ष राजू चिकटे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, निलेश भालेराव, धर्मेंद्र हवेलीकर, रिपाइचे सिद्धार्थ सुमन, विमाशीचे अजय विधाते व संजय ब्राह्मणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे रोशन कोमरेड्डीवार, नगरसेवक फय्याज शेख यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरसेविका, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २३ ऑक्टोबर रोजी होणार असून, निवडणुकीतील चुरस दिवसेंदिवस वाढत आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील सहयोगी पक्षांच्या संयुक्त प्रयत्नांतून अभिजित वंजारी यांच्या प्रचाराला व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. सत्तारूढ पक्षाच्या धोरणांतील त्रुटींवर टीका करत पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अभिजित वंजारी यांना पुन्हा संधी देऊन विजयी करण्याचे आवाहन केले. पदवीधरांच्या रोजगार, शिक्षण, परीक्षा शुल्क, शासकीय भरती, कौशल्यविकास आणि प्रशासकीय पातळीवरील प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे पुरेसे लक्ष नसल्याची टीका करण्यात आली. पदवीधरांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविणारा आणि प्रश्नांची जाण असलेला प्रतिनिधी म्हणून अभिजित वंजारी यांना पसंतीक्रमांक एक देण्याचे आवाहन करण्यात आले.

अभिजित वंजारी यांनी आपल्या भाषणात नागपूर विभागातील पदवीधरांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर भाष्य केले. पदवीधर मतदारसंघ हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून, शिक्षित तरुणांच्या भवितव्याशी निगडित असल्याचे त्यांनी सांगितले. रोजगाराच्या संधी, पारदर्शक भरती प्रक्रिया, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा, उच्च शिक्षणातील अडचणी आणि पदवीधरांच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

“पदवीधरांच्या प्रश्नांसाठी सभागृहात सातत्याने आवाज उठविणे आणि शासनाकडून ठोस निर्णय करून घेणे ही माझी प्राथमिकता राहील. २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानात पसंतीक्रमांक एक देऊन विजयी करावे,” असे आवाहन वंजारी यांनी केले.

शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनीही पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली. शिक्षण क्षेत्रातील समस्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न तसेच पदवीधर युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेससह सहयोगी पक्षांचे पदाधिकारी आणि विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी अभिजित वंजारी यांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी होत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

सभेचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार यांनी केले. सूत्रसंचालन सूरज गावंडे यांनी, तर आभार भूपेश कायरकर यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये