विधवा शेतमजुराचे घर आगीत जळून खाक!
संसार उघड्यावर ; नुकसानभरपाई देण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यातील जोगापूर येथे सिंधू बंडू गावडे या विधवा शेतमजुराच्या घराला अचानक आग लागल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत संबंधित कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, संसार उघड्यावर आल्याने आता जगायचे कसे असा प्रश्न गरीब शेतमजूर महिले समोर उभा ठाकला आहे . शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
जोगापूर येथील सिंधू बंडू गावडे यांच्या घराला सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने घरातील अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी वस्तू तसेच घराच्या छतावरील लाकडी फाटे जळून खाक झाले. या आगीत घरातील जीवनावश्यक साहित्याची राखरांगोळी झाल्याने कुटुंबासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
सिंधू गावडे या विधवा असून शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. घरात एकटीच राहते. अशा परिस्थितीत घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य नष्ट झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उदरनिर्वाहासोबतच आता राहण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची दखल घेत तलाठ्यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे. मात्र, पंचनाम्यानंतर नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाकडून तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे.
प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन नुकसानीचा योग्य आढावा घ्यावा आणि शासनाच्या नियमानुसार सिंधू बंडू गावडे यांना आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.



