ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीला प्राधान्य देण्यासाठी महोत्सवावरील खर्चात कपात

मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करून निधी शेतकर्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय, धार्मिक परंपरा आणि सामाजिक उपक्रम मात्र कायम

 चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ भक्तिगीतांचा स्वर, भक्तीमय वातावरण, सामाजिक उपक्रम आणि स्थानिक कलाकारांच्या कलाविष्काराने राज्यभरात विशेष ओळख निर्माण करणारा चंद्रपूरचा श्री महाकाली माता महोत्सव यंदा सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून देणार आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहना नंतर दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीला प्राधान्य देण्यासाठी महोत्सवावरील खर्च कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय श्री महाकाली माता महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतला आहे. महोत्सवात मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम रद्द करून त्यासाठीचा वाचणारा निधी मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

            दुष्काळामुळे शेतकरी संकटाचा सामना करत असताना उत्सवावरील खर्चापेक्षा त्यांच्या मदतीला अधिक महत्त्व दिले पाहिजे, अशी भूमिका आमदार किशोर जोरगेवार यांनी मांडली. महाकाली मातेवरील श्रद्धा आणि भक्तिभाव कायम ठेवतानाच समाजाप्रती असलेले कर्तव्यही जपले गेले पाहिजे, या भावनेतून त्यांनी महोत्सवाचा खर्च कमी करण्याची सूचना केली आहे. शेतकर्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचा संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे. धार्मिक उत्सवाला समाजहिताची जोड देत दुष्काळग्रस्त कुटुंबांसाठी मदतीचा मार्ग खुला करण्याचा हा प्रयत्न आहे.

             दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री महाकाली माता महोत्सवाची भव्य तयारी करण्यात आली होती. १४ ऑक्टोबरपासून नियोजित असलेल्या पाच दिवसीय महोत्सवात सुप्रसिद्ध भक्तिसंगीत गायक गजेंद्र प्रताप सिंह, हेमंत ब्रिजवासी, चौतन्य देवढे आणि प्रसिद्ध गायिका जयपिंदर नरुला यांच्या भक्तिमय गायन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महोत्सवावरील खर्च कमी होणार असून, वाचणारा निधी शेतकर्यांच्या मदतीसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

             महोत्सवातील धार्मिक परंपरा आणि सामाजिक उपक्रम मात्र पूर्वनियोजित स्वरूपात सुरू राहणार आहेत. यामध्ये ९९९९ कन्यांचे पूजन व भोजन, सौभाग्यवती महिलांना अखंड सौभाग्याची कामना करत हिरवा चुडा भरून देण्याचा उपक्रम तसेच नवरात्रीदरम्यान जन्मलेल्या कन्यांना चांदीचे नाणे वाटप करण्यात येणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी नगरप्रदक्षिणाही काढण्यात येणार आहे.

   महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम कमी झाले असले, तरी त्यामागील सामाजिक हेतू अधिक व्यापक आहे. एका बाजूला महाकाली मातेच्या भक्तीची परंपरा जपत दुसर्या बाजूला दुष्काळाने अडचणीत आलेल्या शेतकर्यांच्या वेदनांची जाणीव ठेवण्याचा प्रयत्न यंदाच्या महोत्सवातून करण्यात येत आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेला हा निर्णय श्रद्धा, संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यांचा सुंदर संगम ठरणार आहे.

घटस्थापनेच्या मंगलपर्वावर माता महाकाली मंदिरात ५१ फूट उंच ध्वजाचे ध्वजारोहन

  आराध्य दैवत श्री माता महाकालीच्या भक्तिभावाने आणि जयघोषाने चंद्रपूर नगरी पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणाने भारावून जाणार आहे. माता महाकाली महोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, घटस्थापनेच्या मंगलमय पर्वावर श्री माता महाकाली मंदिरात ५१ फूट उंच ध्वजाचे भव्य ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

            रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता श्री महाकाली माता मंदिर परिसरात हा ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. उंच ध्वजाच्या ध्वजारोहणातून माता महाकालीप्रती असलेली अढळ श्रद्धा आणि भक्तिभाव व्यक्त केला जाणार असून, या मंगलमय सोहळ्यामुळे नवरात्रोत्सवाच्या उत्साहात भर पडणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये