ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना २४ तास अखंडित वीजपुरवठा मिळावा; आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी महावितरणला तातडीने निर्देश देण्याची मागणी

चांदा ब्लास्ट

शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पाठपुरावा; कृषिपंपांच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना आग्रह

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर बनली असून, पावसातील दीर्घ खंडामुळे शेतीपिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना सिंचनावर अवलंबून राहावे लागत असताना, कृषिपंपांसाठी अखंडित वीजपुरवठा मिळणे अत्यंत आवश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरू नये आणि विशेषतः धान उत्पादक शेतकऱ्यांना पिकांसाठी आवश्यक पाणी वेळेवर देता यावे, यासाठी कृषिपंपांना २४ तास अखंडित व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी यापूर्वीही दोन पत्रांद्वारे शासनाचे लक्ष वेधले असून, दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

विशेषतः धान उत्पादक शेतकऱ्यांना पावसातील खंडामुळे पिके वाचविण्यासाठी सिंचनावर अवलंबून राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत वीजपुरवठा खंडित झाल्यास पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवू शकते. त्यामुळे कृषिपंपांना २४ तास अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा, अशी ठाम मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी यापूर्वीही दोन पत्रांद्वारे शासनाचे लक्ष वेधले आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने, पावसातील दीर्घ खंडामुळे शेतीसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः धान उत्पादक भागांत पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी नियमित सिंचन अत्यावश्यक आहे. मात्र, कृषिपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे आणि तांत्रिक बिघाड वेळेत दूर न होणे यांमुळे शेतकऱ्यांना पिकांना आवश्यक पाणी देता येत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.शेतकरी आधीच बियाणे, खते, मजुरी आणि वाढत्या उत्पादन खर्चाचा भार सहन करीत आहेत. त्यात पावसाच्या अनिश्चिततेमुळे सिंचनाची गरज वाढली असताना वीजपुरवठाच अनियमित राहिला, तर पिकांचे नुकसान आणि आर्थिक संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पाणी उपलब्ध असूनही वीज नसल्यामुळे ते पिकांपर्यंत पोहोचवता येत नसेल, तर शेतकऱ्यांच्या कष्टांचे मोल धोक्यात येते. ही परिस्थिती केवळ वीज वितरणातील तांत्रिक समस्या म्हणून न पाहता, शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी आणि त्यांच्या कुटुंबांच्या भविष्याशी निगडित गंभीर प्रश्न म्हणून हाताळली पाहिजे, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी निवेदनाद्वारे मांडली आहे.

 आ.मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून सादर केलेल्या पत्रांवर संबंधित अतिरिक्त मुख्य सचिव (ऊर्जा) यांना कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले होते. पण अजून पर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेता, या निर्देशांच्या अनुषंगाने कृषिपंपांच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणे आवश्यक असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. शासनस्तरावर घेतलेल्या निर्णयांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्या शेतापर्यंत सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित होणे महत्त्वाचे असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषिपंपांसाठी नियमित २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासोबतच, ज्या गावांमध्ये वारंवार वीजखंडित होत आहे, तेथील विद्युत वाहिन्या आणि अन्य तांत्रिक यंत्रणांची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे. कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या दूर करून कृषिपंप योग्य क्षमतेने चालतील, याची दक्षता घेण्याची गरजही आ.मुनगंटीवार यांनी पत्रात अधोरेखित केली आहे. धान उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांची सिंचनाची गरज लक्षात घेऊन त्यांना प्राधान्याने अखंडित वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय, वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रभावी संपर्क यंत्रणा कार्यान्वित करावी, आवश्यक तांत्रिक कर्मचारी व दुरुस्ती पथके उपलब्ध करून द्यावीत आणि बिघाड दीर्घकाळ कायम राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सुचविले आहे.

वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. प्रभावित गावांमधील वीजपुरवठ्याचा विशेष आढावा घेऊन केलेल्या उपाययोजनांचा अहवाल निश्चित कालमर्यादेत सादर करावा. तसेच, कमी पावसामुळे बाधित भागांची पाहणी करून पिकांना आवश्यक सिंचन आणि पाणी उपलब्धतेबाबत संबंधित विभागांच्या समन्वयातून विशेष कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी आ.मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पावसाच्या अनिश्चिततेशी झुंज देत, कर्जाचा आणि उत्पादन खर्चाचा भार पेलत शेतकरी मोठ्या आशेने पीक उभे करतो. अशा वेळी आवश्यक वीजपुरवठा न मिळाल्याने त्याचे पीक धोक्यात येणे, ही बाब संवेदनशीलतेने हाताळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या कष्टांचे संरक्षण करणे आणि संकटाच्या काळात त्यांना आवश्यक आधार देणे ही शासन व प्रशासकीय यंत्रणेची महत्त्वाची जबाबदारी आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून महावितरण आणि संबंधित विभागांना स्पष्ट, कालबद्ध व परिणामकारक कार्यवाहीचे निर्देश द्यावेत. कृषिपंपांसाठी सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करून दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात,अशी ठाम मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये