ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरकुलच्या ‘स्पर्श’ प्रणालीने लाभार्थ्यांची डोकेदुखी.!

दोन-दोन महिन्यांपासून अनुदानाची प्रतीक्षा ; उधारी, कर्ज आणि व्यापाऱ्यांच्या तगाद्याने लाभार्थी हतबल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरकुलाचे बांधकाम सुरू केले; मात्र दोन-दोन महिने उलटूनही अनुदान खात्यात जमा होत नसल्याने लाभार्थ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. शासनाची ‘स्पर्श’ प्रणाली लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून, अनुदान नेमके कुठे अडले, हेच समजत नसल्याने लाभार्थ्यांना ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या वारंवार चकरा माराव्या लागत असल्याची वेळ गोंडपिपरी तालुक्यातील घरकुल धारकांवर आली आहे.

‘स्पर्श’ प्रणालीअंतर्गत राज्य शासन, केंद्र शासन, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आणि ट्रेझरी अशा विविध स्तरांवरील प्रक्रियेनंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते. मात्र, या प्रक्रियेत विलंब नेमका कुठे होत आहे, याची स्पष्ट माहिती मिळत नसल्याने लाभार्थी हतबल झाले आहेत. अनुदानाबाबत विचारणा करण्यासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही ठोस उत्तर मिळत नसल्याची त्यांची अडचण आहे.

विशेष म्हणजे, घरकुल मंजूर होऊनही अनुदानासाठी लाभार्थ्यांना वारंवार कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत आहेत. रोजंदारीचे काम सोडून चौकशीसाठी जाणे, प्रवासाचा खर्च करणे, तरी उचित माहिती न मिळणे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे.

*अनुदान नाही, पण देणी थांबेनात!*

घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांनी सिमेंट, लोखंड, विटा आणि इतर साहित्य उधारीवर घेतले आहे. मजुरांची मजुरीही देणे बाकी आहे. अनुदान वेळेत मिळेल, या आशेवर बांधकाम सुरू ठेवणाऱ्या लाभार्थ्यांना आता व्यापारी आणि साहित्य पुरवठादारांच्या तगाद्याला सामोरे जावे लागत आहे. हातात पैसा नसल्याने देणी कशी फेडायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. काहींना उसनवारी, तर काहींना कर्जाचा आधार घ्यावा लागत असल्याने घर बांधण्याचे स्वप्न आर्थिक संकटात अडकले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये