ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डब्लु सी एल अप्रेंटिसशिपधारकांच्या रोजगाराचा प्रश्न १८ ऑक्टोबरच्या आंदोलनात गाजणार!

आमदार बच्चू कडू यांना निवेदन : मुकेश जीवतोडे ययांच्या मार्गदर्शनाखाली, सुमित हस्तक यांच्या नेतृत्वात रोजगारासाठी पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) मध्ये सन २०२१ पासून अप्रेंटिसशिप प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. या प्रश्नाकडे शासन व डब्लु सी एल प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद आमदार बच्चू भाऊ कडू यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना लोकसभा संघटक मुकेश भाऊ जीवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना जिल्हा संघटक सुमित भाऊ हस्तक यांच्या नेतृत्वात हा पुढाकार घेण्यात आला. येत्या १८ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित आंदोलनात अप्रेंटिसशिपधारकांच्या रोजगाराचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला जाणार आहे.

डब्लु सी एल मध्ये अप्रेंटिसशिप प्रशिक्षण पूर्ण करूनही रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी नागपूर येथील संविधान चौक तसेच WCL च्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांच्या (CMD) कार्यालयासमोर आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, अद्याप त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय झालेला नाही.

प्रशिक्षणानंतरही रोजगाराची प्रतीक्षा

अप्रेंटिसशिप प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित ट्रेडनुसार प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि कौशल्यविकासाची संधी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रशिक्षणार्थ्यांकडून त्यांच्या ट्रेडशी असंबंधित कामे करून घेतली जात असल्याच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही रोजगारासाठी संघर्ष करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

१८ ऑक्टोबरच्या आंदोलनात प्रश्न लावून धरणार

आमदार बच्चू कडू यांनी निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे उपस्थितांनी सांगितले. येत्या १८ ऑक्टोबर रोजी WCL प्रशासनाविरोधात आयोजित करण्यात येणाऱ्या आंदोलनात अप्रेंटिसशिप विद्यार्थ्यांच्या रोजगाराचा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित करून तो लावून धरण्यात येईल, असे त्यांनी सांगितल्याची माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

अप्रेंटिसशिपधारकांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी १८ ऑक्टोबरच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्य व प्रशिक्षणानुसार रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी आणि त्यांच्या भविष्याबाबत शासन व WCL प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

या वेळी करण तिडके, अनोखा गेडाम, अक्षय बोडणे, कुणाल कोरंगे यांच्यासह अनेक अप्रेंटिसशिप विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये