बाजार रस्त्याच्या प्रश्नावर आजी व माजी नगराध्यक्षांची ट्रँग्यूलर फाईट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील मुख्य बाजार वॉर्डातील रस्त्याच्या बांधकामावरून राजकीय वातावरण तापले असून, या मुद्द्यावरून विद्यमान नगराध्यक्ष प्रफुल चटकी आणि माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर व सुनील नामोजवार यांच्यात वैचारिक संघर्ष सुरू झाला आहे. रस्त्याच्या सद्यस्थितीवरून माजी नगराध्यक्षांनी नियोजनातील त्रुटींवर बोट ठेवले असताना, नगराध्यक्ष चटकी यांनी पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा समन्वय साधण्यासाठी रस्त्याचे काम थांबविल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र या सगळ्या गोष्टींचा परिणाम रस्ता बांधकामावर निश्चित झाला असून त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा त्रास भद्रावतीकरांना सोसावा लागत आहे हे मात्र खरे.
पाईपलाईनच्या नियोजनावरून धानोरकरांचा सवाल
माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी बाजारातील मुख्य रस्त्याखालून पाईपलाईन टाकण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नागमंदिर ते ठेपाले वेल्डिंग व सातपुते बार परिसरातून पर्यायी मार्गाने पाईपलाईन नेता आली असती, असे सांगत त्यांनी नियोजनाअभावी रस्त्याच्या कामाला विलंब झाल्याचा आरोप केला. रस्त्यावरील खड्डे आणि नागरिकांची गैरसोय यासाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली.
नियोजनातील त्रुटींवर नामोजवारांची टीका
माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार यांनी रस्त्याच्या कामासाठी सात ते आठ महिन्यांपूर्वी निविदा काढूनही काम रखडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. खडीकरण, डांबरीकरण आणि खड्डे दुरुस्ती यांचे एकत्रित नियोजन आवश्यक होते, असे सांगत त्यांनी नगरपरिषदेच्या कार्यपद्धतीवर टीका केली. नागरिकांची गैरसोय टाळून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.
आचारसंहितेमुळे काम रखडल्याचे चटकींचे स्पष्टीकरण
विद्यमान नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी रस्त्याचे काम जाणीवपूर्वक थांबविले नसल्याचे स्पष्ट केले. पाईपलाईनसाठी आधी रस्ता बांधल्यास पुन्हा खोदकाम करावे लागले असते. त्यामुळे निधीचा अपव्यय टाळण्यासाठी पर्यायी मार्ग निवडण्यात आला. सुधारित अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू झाली; मात्र आदर्श आचारसंहितेमुळे आर्थिक बोली उघडण्याची प्रक्रिया थांबल्याचे त्यांनी सांगितले. आचारसंहिता संपल्यानंतर काम सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे तिघेही एकमेकांविरोधात उभे होते. त्यामुळे ‘एक रस्ता, तीन नेते व तीन भूमिका’ या मुद्द्यावरून सुरू झालेली ही वैचारिक ट्रँग्यूलर फाईट आता कोणते वळण घेते, याकडे भद्रावतीकरांचे लक्ष लागले आहे.



