ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवावे – प्राचार्य ज्ञानेश्वर धोटे यांचे मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी, स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांनी भविष्यात विविध प्रशासकीय पदांवर कार्य करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून नियोजनबद्ध अभ्यास करावा, या उद्देशाने सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे शुक्रवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संजय गाडगे होते, तर गडचांदूर येथील प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर धोटे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख प्रा. दिनकरराव झाडे तसेच विज्ञान विभागप्रमुख प्रा. सोज्वल ताकसांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रा. झाडे यांनी आपल्या प्रभावी प्रास्ताविक मधून कार्यक्रमाची रूपरेषा मांडत उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.

प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर धोटे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व विशद करून विविध शासकीय व प्रशासकीय सेवांमधील संधींबाबत मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच ध्येय निश्चित करणे, नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करणे, चालू घडामोडींचे वाचन करणे, सामान्य ज्ञान वाढविणे आणि वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी किंवा शैक्षणिक गुणांवर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आवाका वाढविणे, वाचनाची सवय जोपासणे आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाची माहिती करून घेणे गरजेचे आहे. योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि सातत्य यांच्या बळावर विद्यार्थी प्रशासकीय क्षेत्रात यश संपादन करू शकतात, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार करिअरची दिशा निवडून त्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी महाविद्यालयीन जीवनापासूनच सुरू करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. संजय गाडगे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि ध्येयपूर्तीची जिद्द निर्माण होण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरतात, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी योग्य नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, करिअर नियोजन आणि प्रशासकीय सेवांमधील संधी यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिल्पा कोल्हे यांनी केले, तर आभार प्रदर्शनात प्रा. डॉ. राजेश बोळे यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सातारकर , प्रा. जहीर, प्रा. सुरपाम, प्रा. टेकाडे, प्रा. मेहेरकुरे, प्रा. डफाडे, कु. स्नेहल चांदेकर, श्री. शशिकांत भाऊ यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी योग्य दिशा देणारा आणि भविष्यातील करिअरविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा हा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये