अवैध दारुविक्रेत्यांवर जिल्हा पोलिसांची वॉशआऊट मोहीम
गुन्ह्यांत रुपये 88 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी वर्धा पोलीस दलाने दि. 07/10/2026 ते 08/10/2026 रोजी अत्यंत नियोजनबद्ध ‘वॉशआऊट” मोहीम यशस्वीरित्या राबविली. या धडक कारवाईत जिल्ह्यामध्ये 27 अवैद्य देशी/विदेशी दारू विक्रीचे गुन्हे तसेच 111 गावठी दारू विक्रीचे असे एकूण 138 गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे 88 लाख 48 हजार रुपयांचा दारूसाठा आणि संबंधित मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची योजना आखली. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणावर दारू गाळून ती मोठ्या प्रमाणात तयार करून त्याचा साठा साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारावर अवैध दारूभट्टयांच्या ठिकाणी, विशेषतः शहरालगतचा परिसर तसेच गावाबाहेर, जंगल शिवारात आणि जाण्या-येण्यास अडचणीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून गोपनीय पाळत ठेवण्यात आली. त्याच प्रमाणे बाहेरील जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने विक्रीस येणारी देशी विदेशी दारू विक्री करणारे आणि ती विकण्याच्या ठिकाणावर पाळत ठेवण्यात आली.श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या नेतृत्वाखाली श्री सदाशिव वाघमारे, अपर पोलिस अधीक्षक, वर्धा यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यांतील 4 उपविभागीय पोलीस अधिकारी, 42 अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा असे एकूण 326 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला. दि. 07/10/2026 च्या पहाटे 06.00 वाजल्यापासून या सर्व गावठी दारूभट्टीची ठिकाणे आणि देशी विदेशी दारूची विक्री करण्याच्या ठिकाणावर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत एकूण 141 आरोपींवर 138 गुन्हे दाखल करण्यात आले. भविष्यातील कठोर कारवाईचे संकेत या अचानक केलेल्या ‘वॉशआऊट” मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांचे धावे दणाणले आहेत. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, “वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचे कोणतेही प्रकार चालणार नाहीत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि दारू विक्रेत्यांकडून कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून अशा प्रकारची कारवाई (वॉशआऊट मोहीम) पुढेही राबविण्यात येणार आहे…”



