बनावट ई-चलान (e-Challan) एसएमएस आणि एपीके (APK) फाईल्सद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीबाबत वर्धा पोलिस दलातर्फे नागरिकांसाठी अतिमहत्त्वाची जनजागृतीपर मार्गदर्शक सूचना.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्यांचा वापर केला जात आहे. विशेषतः, वाहन चालकांना लक्ष्य करून ‘बनावट ई-चलान’ व संशयास्पद एपीके (APK) फाईल्सच्या माध्यमातून बँक खाती रिकामी करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
फसवणुकीची कार्यपद्धतीः सायबर गुन्हेगार नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस, व्हॉट्सअॅप किंवा ईमेलद्वारे वाहतूक नियमभंगाचे खोटे संदेश पाठवतात. संदेशामध्ये वाहन चालकावर ओव्हरस्पीडिंग, विनाहेल्मेट वाहन चालवणे किंवा सिग्नल तोडल्यासारखे आरोप ठेवून दंडाची रक्कम भरण्यास सांगितले जाते. या संदेशासोबत एक बनावट लिंक, क्यूआर कोड किंवा एखादी एपीके (APK) फाईल जोडलेली असते. जेव्हा नागरिक घाईघाईने किंवा भीतीपोटी त्या लिंकवर क्लिक करून अज्ञात अॅप इन्स्टॉल करतात किंवा ऑनलाईन पेमेंट करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांच्या मोबाईलचा ताबा सायबर चोरांकडे जातो. परिणामी, बँक तपशील, युपीआय पिन, ओटीपी आणि गोपनीय वैयक्तिक माहिती
चोरीला जाऊन बँक खात्यातील सर्व रकमा परस्पर लांबविल्या जातात.
नागरिकांसाठी सुरक्षा व बचावविषयक उपाययोजनाः
१. अधिकृत पडताळणी कराः वाहतूक चलनाची कोणतीही माहिती केवळ शासकीय व अधिकृत संकेतस्थळावरून किंवा अधिकृत मोबाईल अॅपवरूनच खात्री करून घ्यावी. कोणत्याही अनाधिकृत दुव्यावर विश्वास ठेवू नये.
२. अज्ञातांकडून आलेल्या अॅप्सचा वापर टाळाः कोणत्याही अज्ञात स्रोताकडून किंवा अनोळखी क्रमांकावरून आलेली एपीके (APK) फाईल किंवा अॅप आपल्या मोबाईलमध्ये कधीही डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका, शासकीय विभाग कधीही थेट एपीके फाईल पाठवून दंड भरण्यास सांगत नाहीत.
३. गोपनीयता बाळगाः आपला युपीआय पिन, पासवर्ड, ओटीपी (OTP) किंवा कोणत्याही प्रकारचे बँक तपशील फोन किंवा मेसेजवर कोणाशीही शेअर करू नका,
४. शहानिशा कराः कोणत्याही संदेशाबाबत शंका किंवा संशय असल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा वाहतूक शाखा कार्यालयात संपर्क साधून सत्यता तपासा.
फसवणूक झाल्यास तातडीने करावयाची कारवाईः
फसवणूक झाल्यास प्राप्त झालेला मेसेज, स्क्रीनशॉट आणि बँक व्यवहाराचे तपशील सुरक्षित ठेवा. तत्काळ संबंधित बँकेच्या अधिकृत ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून आपले बँक खाते, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ब्लॉक करून घ्या. आर्थिक फसवणूक झाल्यास कोणत्याही विलंबाशिवाय राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर त्वरित संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आपली ऑनलाइन तक्रार नोंदवा. नजीकच्या सायबर पोलीस स्टेशन किंवा स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन तात्काळ लेखी तक्रार दाखल करा.
“वर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोणत्याही अज्ञात व्यक्ती किंवा यंत्रणेने पाठवलेल्या संशयास्पद ई-चलान लिंक किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नये. सायबर गुन्हेगारीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सतर्क राहा आणि नेहमी अधिकृत शासकीय स्रोतांचाच वापर करा.”



