ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारू, गांजा, चरस व ऑनलाइन जुगारावर कठोर कारवाईची मागणी

ब्रह्मपुरी शहरातील अवैध धंद्यांविरोधात भाजप आक्रमक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी : शहरात सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांविरोधात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष डॉ. सुयोगकुमार वामनराव बाळबुधे व नगर सेवक मनोज भूपाल यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, याबाबत ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन संबंधितांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.ब्रह्मपुरी हे “शैक्षणिक नगरी” तसेच “क्रीडा नगरी” म्हणून ओळखले जाते. शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र, मागील काही काळापासून शहरात ऑनलाइन लॉटरी, ऑनलाइन जुगार, सट्टा-जुगार तसेच अमली पदार्थांची विक्री व सेवन यांसारख्या अवैध प्रकारांबाबत नागरिकांमध्ये चर्चा असून, याचा तरुण पिढीच्या भविष्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विशेषतः चरस, गांजा, ड्रग्ज व इतर अमली पदार्थांच्या विक्रीवर तातडीने आळा घालावा, तसेच अवैध धंद्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.अवैध धंदे चालविणाऱ्या व्यक्तींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवरही कायद्यानुसार कारवाई करून या अवैध व्यवसायांना कायमस्वरूपी आळा बसण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी डॉ. बाळबुधे आणि न. सेवक मनोज भूपाल यांनी केली.विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच ब्रह्मपुरी शहर “शैक्षणिक नगरी व क्रीडा नगरी” असुन या संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी शहरातील व बाहेरुनशिक्षणाकरिता आलेली विद्यार्थी व्यसनाधीन होण्याच्या घटना वाढत असून शहरामध्ये दारू जुगार व घातक असे अंमली पदार्थ अवैध विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे.

या प्रकरणात विक्रेते नाबालीक मुला- मुलींना लक्ष करीत आहेत.अशा विक्री करणा-यावर कठोर कारवाई झाली पाहिजे व शहराची शांतता सुरक्षितता कायम राहिली पाहिजे त्यासाठी पोलीस प्रशासनाने गस्त वाढवून विक्रेत्यांवर कार्यवाही झाली पाहिजे असे निवेदन देतांना नगर सेवक मनोज भूपाल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. निवेदनाच्या प्रती मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनाही देण्यात आल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये