ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त जि. प. उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे विविध स्पर्धांचा जल्लोष!

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव; निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेच्या सन्मानाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ मोठ्या उत्साहात व विविध शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. मातृभाषेची महती, गौरव आणि भाषिक समृद्धी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने शाळेत आठवडाभर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. विनोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांच्या सुप्त भाषिक व कलागुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धा अशा विविधांगी स्पर्धा घेण्यात येत आहेत.

सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये स्वयंस्फूर्तीने आणि मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. वक्तृत्व व कथाकथन स्पर्धेतून चिमुकल्यांनी मराठी भाषेचा गोडवा उपस्थितांसमोर मांडला, तर चित्रकला व घोषवाक्य स्पर्धेतून मराठीची अस्मिता आणि वाचन संस्कृतीचे महत्त्व रेखाटले. निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास व भाषेचे संवर्धन यावर प्रभावी विचार मांडले.

विद्यार्थ्यांच्या दर्जेदार सादरीकरणासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकांनी मार्गदर्शक म्हणून मोलाची भूमिका बजावली. “मराठी भाषेला लाभलेला अभिजात भाषेचा दर्जा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद असून, शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये मातृभाषेची गोडी, व्याकरणाची अचूकता आणि वाचन-लेखन संस्कृती रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे,” असे विचार मुख्याध्यापक विनोद क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत असून, पालक वर्गातून या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये