ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजात पोलिस ठाण्यासमोर सशस्त्र हल्ला; नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

देऊळगाव राजात दोन गटांत संघर्ष; चार जखमींपैकी दोघांचा जालन्यात उपचारादरम्यान मृत्यू, शहरात चोख बंदोबस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : कव्वालीच्या कार्यक्रमात मुलांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणानंतर उफाळलेल्या वादाचे पर्यवसान सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दोन गटांतील सशस्त्र संघर्षात झाले. देऊळगाव राजा पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर झालेल्या या घटनेत चार जण जखमी झाले. त्यांपैकी शिंदेसेनेचे नगरसेवक शेख अन्वर शेख अली आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प)चे आरिफ खान हारून खान पठाण या दोघांचा जालना येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी बोलतांना दिली. घटनेनंतर शहरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री आठवडी बाजार परिसरातील कव्वालीच्या कार्यक्रमात मुलांमध्ये भांडण झाले होते. त्याचे पडसाद सोमवारी उमटले. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पुन्हा वाद झाल्यानंतर तक्रार आणि वाद मिटविण्यासाठी दोन्ही गटांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आल्याची माहिती आहे.

पोलिस ठाण्यात आलेल्या दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर प्रवेशद्वारासमोर वाद चिघळून परस्परांवर शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या संघर्षात तलवार आणि चाकूचा वापर झाल्याची प्राथमिक माहिती आहे; मात्र नेमकी कोणती शस्त्रे वापरण्यात आली, याची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेख अन्वर आणि आरिफ खान पठाण यांना पुढील उपचारांसाठी जालना येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला. अन्य दोघेही या घटनेत जखमी झाले आहेत. मुलांच्या भांडणानंतर सुरू झालेल्या वादात दोन राजकीय गट आमनेसामने आल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. संघर्षाचे नेमके कारण आणि घटनाक्रम पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे हेही मध्यरात्री देऊळगाव राजा येथे पोहोचले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला असून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणात देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली नव्हती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये