ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोसीखुर्दच्या पाण्यावर शेती हिरवीगार करण्याची गरज

कालवा गोंडपिपरी तालुक्यात वळता करण्याची काँग्रेस नेते किशोर वडेट्टीवार यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ अपुऱ्या पावसामुळे गोंडपिपरी तालुक्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती निर्माण झाली असून शासनाने तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला आहे. मात्र, दुष्काळ जाहीर करण्यापुरतीच मदत न देता शेतकऱ्यांना आगामी हंगामापर्यंत आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यातील कापूस, सोयाबीन व धान पिके पाण्याअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत गोसीखुर्द कालवा गोंडपिपरी तालुक्यात वळता करून तालुक्यातील शेती हिरवीगार करण्याची गरज असल्याचे मत काँग्रेस नेते किशोर वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

गोंडपिपरी तालुक्याच्या सभोवताल वर्धा वैनगंगा, अंधेरी व अन्य जलस्रोत असतानाही सिंचनाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने दरवर्षी शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. पाण्याचे नैसर्गिक स्रोत मुबलक असतानाही सिंचन प्रकल्पांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे तालुक्याची शेती कोरडवाहूच राहिली आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे सिंचनाच्या सुविधा उभ्या राहू शकल्या नाहीत, अशी शेतकऱ्यांमध्ये भावना आहे.

गोसीखुर्द प्रकल्पाचा कालवा गोंडपिपरी तालुक्याच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचला असतानाही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याची नाराजी आहे. सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राजकीय नेत्यांनी ठोस इच्छाशक्ती दाखवून गोसीखुर्द प्रकल्पाचा कालवा गोंडपिपरी तालुक्यात वळता करण्याची गरज आहे.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मिळणारी तुटपुंजी शासकीय मदत शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा वर्षभराचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेशी ठरणार नाही. पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधनच बंद झाले आहे. त्यामुळे दुष्काळाच्या काळात शेतकरी कुटुंबांना आगामी हंगामापर्यंत आर्थिक आधार देणे आवश्यक आहे.

काँग्रेस नेते किशोर वडेट्टीवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना एक वर्षासाठी दरमहा १० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच सिंचनाच्या कायमस्वरूपी सुविधा निर्माण करून गोंडपिपरी तालुक्यातील शेतीला पाण्याची शाश्वत व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

दुष्काळाची घोषणा झाली असली तरी केवळ मदतीच्या घोषणांनी प्रश्न सुटणार नाही. तालुक्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करून शेतकऱ्यांना बारमाही पाण्याची सुविधा मिळवून देणे, हाच दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये