कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश
चाईल्ड हेल्पलाईन १०९८ ची मोलाची भूमिका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
तालुक्यातील एका गावात होणारा अल्पवयीन बालिकेचा बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आणि ऐनवेळी केलेल्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे यशस्वीरित्या थांबवण्यात आला आहे. ही कारवाई ३ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील धारणा येथील एका अल्पवयीन बालिकेचा विवाह कारंजा (घा.) तालुक्यातील २४ वर्षीय युवकाशी ठरला होता. या बालविवाहाबाबतची प्राथमिक व अपूर्ण माहिती महिला व बालविकास विभागाच्या चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या टोल-फ्री क्रमांकावर एका कॉलरद्वारे प्राप्त झाली होती.
माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक पथकाचे पोलीस कर्मचारी नवनाथ मुंडे यांच्याशी तातडीने समन्वय साधून घटनास्थळाचा शोध घेण्यात आला. त्यानंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तृप्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथक त्वरित घटनास्थळी रवाना झाले.
कुटुंबीयांचे समुपदेशन व जबाबनामा
घटनास्थळी पोहोचलेल्या पथकात जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन, पोलीस विभाग आणि स्थानिक प्रशासनाचा समावेश होता. चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक आशिष मोडक व सहकाऱ्यांनी दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन केले. बालविवाहाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम आणि कायदेशीर धोके समजावून सांगण्यात आले. बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ अंतर्गत बालविवाह हा गंभीर व दंडनीय गुन्हा असल्याचे स्पष्ट केल्यानंतर कुटुंबीयांनी विवाह थांबवण्यास संमती दर्शवली. पालकांकडून बालविवाह रोखण्याबाबतचा अधिकृत जबाबनामा लिहून घेण्यात आला.
या कारवाईप्रसंगी विस्तार अधिकारी साहेबराव खंडार, सरवाडीच्या सरपंच संगीता गोहते, पोलीस उपनिरीक्षक मनोज शेंडे, संरक्षण अधिकारी नितीन जुगनाके, रामेश्वर राठोड, अंगणवाडी सेविका तथा सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी निर्मला चोपडे, पोलीस पाटील प्रथमेश बीरगेड, तसेच चाईल्ड हेल्पलाईनचे जयश्री निवल, पुरुषोत्तम कांबळे, संतोष डोणे व वैभव भांदककर उपस्थित होते.
बाल कल्याण समितीकडे पुढील कारवाई
बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ च्या अनुषंगाने बालिकेच्या शिक्षण आणि सुरक्षेला प्राधान्य देत, तिला बाल कल्याण समिती, वर्धा येथे हजर करण्याचे निर्देश पालकांना देण्यात आले आहेत. पुढील आवश्यक ती कायदेशीर व पुनर्वसनाची कार्यवाही बाल कल्याण समितीमार्फत केली जाईल. ही संपूर्ण मोहीम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तृप्ती चव्हाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी आणि प्रकल्प समन्वयक आशिष मोडक यांच्या समन्वयातून पार पडली.
प्रशासनाचे आवाहन:
“आपल्या पाल्याचा बालविवाह करून त्यांचे भविष्य धोक्यात आणू नका. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून मुलांच्या आरोग्यावर व शिक्षणावर त्याचा गंभीर परिणाम होतो. कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास तात्काळ १०९८ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.”
2 ऑक्टोंबर रोजी व्यापक प्रमाणात बालविवाह मुक्त ग्रामपंचायत जनजागृती कार्यक्रम राबवले आहेत, बालविवाह होऊ न देण्यास प्रशासन कटिबद्ध आहे.
— तृप्ती चव्हाण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, वर्धा



