जनजागृती रॅलीमधून वन्यजीव संवर्धनाचा संदेश!
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; वन विभागाकडून वन्यजीव संरक्षणाबाबत मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत गोंडपिपरी येथे वन विभागाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला.
वन्यजीवांचे संरक्षण, वनसंपदेचे संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. वन्यप्राणी हे निसर्गचक्रातील अत्यंत महत्त्वाचे घटक असून, त्यांच्या संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रॅलीनंतर विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे महत्त्व, वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास, जैवविविधतेचे संवर्धन तसेच मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वन्यप्राण्यांबाबत गैरसमज दूर करून त्यांच्या संरक्षणासाठी नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक वाघाये, सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धाबा वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गौरकार यांच्या नेतृत्वात वन्यजीव सप्ताह निमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक कोकाटे, दिपक वांढरे अध्यक्ष निसर्ग सखा संस्था, बी. टी. पुरी क्षेत्र सहाय्यक गोंडपिपरी, पेंदोर क्षेत्र सहाय्यक धाबा, वनपाल आवळे, वनरक्षक नागरे, झारखंडे, कातकर, मेश्राम, बोकडे, भिवापुरे, मारगोनीवार तसेच धाबा वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वनमजूर व रोजंदारी मजूर उपस्थित होते. मोठ्या संख्येने जनता विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.



