कोठारी–तोहोगाव मार्गावर दोन ट्रक फसले ; वाहतूक ठप्प
टोल वाचविण्यासाठी शॉर्टकटचा वापर., आंध्र–तेलंगणातील अवजड वाहतुकीमुळे बससह वाहने अडकली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ कोठारी–तोहोगाव मार्गाची आधीच दुरवस्था झालेली असताना या मार्गावरून आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातील अवजड ट्रकांची वाहतूक वाढल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. सोमवारी दोन अवजड ट्रक रस्त्याच्या मध्यभागी फसल्याने वाहतूक ठप्प झाली. यामुळे बससह अनेक वाहने अडकून पडली आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
टोल वाचविण्यासाठी तसेच शॉर्टकट म्हणून तोहोगाव–शिरपूर मार्गाचा वापर केला जात असल्याची चर्चा परिसरात आहे. या मार्गावरून अवैध वाहतूक होत असल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या मार्गावरील अवजड वाहतुकीची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असताना त्यावरून मोठ्या क्षमतेचे ट्रक सातत्याने धावत असल्याने रस्त्याची आणखी वाताहत होत आहे. दोन ट्रक एकाच ठिकाणी फसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांची कोंडी झाली. बस आणि इतर वाहनांना पुढे जाता न आल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
यापूर्वीही आर्वी परिसरात ट्रक पलटी झाल्याने याच मार्गावरील वाहतूक बंद पडली होती. वारंवार अवजड वाहने फसणे, पलटी होणे आणि वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडत असताना प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कोठारी–तोहोगाव–शिरपूर मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे तसेच टोल चुकविण्यासाठी किंवा नियमबाह्य वाहतुकीसाठी या मार्गाचा वापर होत आहे का, याची संबंधित विभागाने चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
*कोठारी–तोहोगाव मार्गाची आधीच दुरवस्था.
*दोन अवजड ट्रक रस्त्याच्या मध्यभागी फसले.
*बससह इतर वाहने अडकली; वाहतूक ठप्प.
*आंध्र प्रदेश व तेलंगणातील ट्रकांची वाढती वाहतूक.
*टोल वाचविण्यासाठी शॉर्टकटचा वापर होत असल्याची चर्चा.
*अवैध वाहतुकीच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी.
*आर्वी परिसरातील ट्रक पलटीची यापूर्वीची घटना.
*मार्गाची तातडीने दुरुस्ती व अवजड वाहतुकीवर नियंत्रणाची मागणी



