बंडू बुरांडे यांच्या पाठपुराव्याला यश
जामखुर्दसह चार गावांतील नदीवर बंधारे व वेंटिंग स्ट्रक्चरच्या कामांना प्रशासकीय मान्यतेची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
जामखुर्द : पोंभुर्णा तालुक्यातील भिमणी, देवाडा खुर्द, जामखुर्द आणि चक पोंभुर्णा या गावालगतच्या नदीवर बंधारे व वेंटिंग स्ट्रक्चर उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माजी सरपंच बंडू उर्फ धनराज भाऊजी बुरांडे यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन सादर केले होते. त्यानंतर आमदार मुनगंटीवार यांनी २१ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन संबंधित कामांना जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन २०२६-२७ मध्ये प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
या चारही गावालगतच्या नदीवर एकूण चार बंधारे व वेंटिंग स्ट्रक्चर प्रस्तावित करण्यात आले आहेत. या कामांमुळे परिसरातील पाणीसाठा वाढण्यास तसेच स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, चंद्रपूर यांनीही संबंधित कामांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेतून प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी सादर केला असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणेने नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बंडू बुरांडे यांच्या पाठपुराव्यामुळे या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे



