आई राबतेय संसारासाठी.. लेक झटतेय स्वप्नांसाठी!
कष्टांच्या सावलीत फुलतेय शिक्षणाची नवी पहाट.!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
विठ्ठलवाडाच्या हॉटेलमधील आईची मेहनत अन् लेकीचा अभ्यासाचा संघर्ष!
गोंडपिपरी :_ घरची परिस्थिती बेताची… उदरनिर्वाहासाठी आई-वडिलांची दिवसरात्र धावपळ… शाळा सुटल्यानंतर खेळण्या-बागडण्याच्या वयात थेट आई-वडिलांच्या कामात हातभार लावणारी चिमुकली… पण या सगळ्या परिस्थितीने तिच्या डोळ्यांतील शिक्षणाचे स्वप्न मात्र कधीच हिरावून घेतले नाही. उलट आई-वडिलांचा संघर्ष डोळ्यांसमोर पाहून तिच्या मनातील शिकण्याची जिद्द दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत गेली. आईच्या हातावर कष्टांची घट्ट झालेली त्वचा आणि लेकीच्या हातात वही-पेन… हे दृश्य माणुसकीला आणि मातृत्वाला स्पर्शून जाणारे आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा हायवे लगतच्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये या कुटुंबाच्या संघर्षाची ही हृदयस्पर्शी कहाणी पाहायला मिळते. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी वडील पानठेला चालवतात, तर आईसह घरातील सदस्य हॉटेलमध्ये विविध पदार्थ तयार करण्यापासून ते विक्रीपर्यंतची कामे करतात. सकाळपासून सुरू झालेली कुटुंबाची लगबग दिवसभर सुरू असते.
याच घरातील ही चिमुकली सकाळी शाळेची वाट धरते. पाठीवर दप्तर, डोळ्यांत स्वप्नं आणि मनात शिकण्याची जिद्द घेऊन ती शाळेत जाते. मात्र शाळा सुटल्यानंतर इतर मुलांप्रमाणे खेळण्याऐवजी ती थेट आई-वडिलांकडे येते. हॉटेलमध्ये ग्राहकांची वर्दळ, स्वयंपाकघरातील लगबग, भांड्यांचा आवाज आणि आईची सुरू असलेली धावपळ… या सगळ्या वातावरणातही तिच्या चेहऱ्यावर तक्रारीची छटा दिसत नाही.
ना खाण्याचा हट्ट, ना खेळण्याचा हट्ट… ना परिस्थितीबद्दल कोणतीही नाराजी! शांतपणे दप्तर खाली ठेवायचे, वही-पुस्तके बाहेर काढायची आणि जणू हेच आपले अभ्यासाचे घर आहे, अशा तल्लीनतेने अभ्यासाला सुरुवात करायची—ही तिची दिनचर्या बनली आहे.
मोठ्या सुविधा उपलब्ध नसतानाही मोठी स्वप्ने पाहणाऱ्या या चिमुकलीने परिस्थितीसमोर हार न मानता शिक्षणाची वाट धरली आहे. आईच्या कष्टांना आपल्या अभ्यासाची साथ देणाऱ्या या माय _ लेकीच्या नात्यातील वात्सल्याचा ओलावा आणि संघर्षाची ही सत्यकहाणी समाजासाठी एक प्रेरणादायी संदेश ठरत आहे.
कदाचित उद्या हीच चिमुकली मोठ्या पदावर पोहोचेल. तिच्या यशाची दखल घेतली जाईल. मात्र त्या यशाच्या प्रत्येक पायरीखाली आईच्या कष्टांचा घाम, वडिलांच्या मेहनतीची ताकद आणि विठ्ठलवाड्यातील या छोट्याशा हॉटेलमध्ये केलेल्या अभ्यासाच्या असंख्य क्षणांची आठवण दडलेली असेल.
*आईच्या हातात कष्ट… लेकीच्या हातात पेन!*
एकीकडे आई कुटुंबाचा संसार आणि व्यवसाय सांभाळण्यासाठी राबत असते, तर दुसरीकडे तिची लेक त्याच आईच्या कष्टांकडे पाहत अभ्यासाच्या माध्यमातून आपल्या भविष्याची पायाभरणी करत आहे. आईच्या कपाळावरचा घाम पाहून लेकीला शिक्षणाचे महत्त्व कळते; तर लेकीच्या हातातील वही-पेन पाहून आईच्या मनात उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने फुलतात.
*माय _लेकीच्या भावनांचा संगम.!*
“माझ्या मुलीने शिकावे, मोठे व्हावे…” ही आईच्या मनातील मूक इच्छा आणि “आई-बाबांनी घेतलेल्या कष्टाचे चीज करायचे…” हा लेकीच्या मनातील निर्धार—या दोन भावनांचा सुंदर संगम या छोट्याशा हॉटेलमध्ये दररोज घडतो आहे
*मोबाईलच्या युगात..!*
आज मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात अनेक मुलांचे लक्ष अभ्यासापेक्षा स्क्रीनकडे सहज वळते. मात्र या चिमुकलीसमोर ना महागडी अभ्यासाची खोली, ना शांत वातावरण, ना विशेष सुविधा. तरीही तिच्या हातातील पेन थांबत नाही आणि तिच्या डोळ्यांतील स्वप्नांची चमक कमी होत नाही.



