ऑनलाईन प्रणालीमुळे खत वितरणात पारदर्शकता_ तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे
तालुका स्तरावर प्रशिक्षण संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ ऑनलाईन प्रणालीमुळे खत वितरणात पारदर्शकता येईल आणि शेतकऱ्यांना योग्य दराने खत मिळण्यास मदत होईल, असे मत तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांना आता खत मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक करण्यासाठी खत वितरणाची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गोंडपिपरी तालुक्यातील सर्व खत विक्रेत्यांसाठी तालुका स्तरावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
शासनाच्या नवीन तांत्रिक प्रक्रियेनुसार खत विक्री ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात ऑनलाइन खत खरेदी-विक्री प्रक्रिया, शेतकऱ्यांची आधार क्रमांक नोंदणी, ई-केवायसी प्रक्रिया, खतांची आवक-विक्री नोंद, स्टॉकची माहिती तसेच डिजिटल पद्धतीने नोंदी अद्ययावत करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
आता खत वितरणासाठी डिजिटल पोर्टलचा वापर करण्यात येणार असून, प्रत्येक खत विक्रेत्याने ई-केवायसी, संगणक व इंटरनेट सुविधा उपलब्ध ठेवणे तसेच खत विक्रीची नोंद ऑनलाइन पद्धतीने करणे बंधनकारक राहणार आहे.
या ऑनलाइन प्रणालीमुळे खत वितरणात पारदर्शकता येण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांना वेळेत व योग्य दराने खत उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे. तसेच खतांचा कृत्रिम तुटवडा, अनधिकृत साठेबाजी आणि नियमबाह्य विक्रीला आळा बसण्याची अपेक्षा आहे.
प्रशिक्षणादरम्यान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खत विक्रेत्यांना शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या. विक्रेत्यांनी ठरावीक कालावधीत आपली नोंदणी पूर्ण करून ऑनलाइन खत विक्रीला सुरुवात करावी, असे स्पष्ट करण्यात आले.



