वनसंवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत; धाबा वनपरिक्षेत्रात ‘सेवा सप्ताह’ उत्साहात
पंडित दीनदयाल उपाध्याय महाराजस्व अभियानांतर्गत विविध उपक्रम; वनसंवर्धन, पर्यावरण व जैवविविधतेबाबत जनजागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ वनसंवर्धनासोबतच नागरिकांपर्यंत शासकीय सेवा प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने पंडित दीनदयाल उपाध्याय महाराजस्व अभियानांतर्गत धाबा वनपरिक्षेत्रात ‘सेवा दिन व सेवा सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून वनविभागाच्या विविध सेवा, योजना आणि उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच वनसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, वन्यजीव संवर्धन आणि जैवविविधतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक वाघाये, सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धाबा वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गौरकार यांच्या नेतृत्वात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
सेवा सप्ताहादरम्यान नागरिकांना वनविभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा व योजनांची माहिती देण्यात आली. वनसंपत्तीचे संरक्षण, वन्यजीवांचे संवर्धन, पर्यावरणाचे संतुलन आणि जैवविविधतेचे जतन यासाठी नागरिकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली.
वनक्षेत्राचे संरक्षण केवळ वनविभागाची जबाबदारी नसून, त्यासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. जंगल, वन्यजीव आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
सेवा सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी धाबा वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक पेंदोर, पवार, पुरी, वाकडोत तसेच वनरक्षक नागरे, मेश्राम, झारखंडे, कातकर, बोकडे, राठोड, मार्गोनवार, भिवापूरे यांच्यासह वनकर्मचारी आणि वनमजुरांनी परिश्रम घेतले.
वनविभागाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि वनसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सेवा सप्ताहाला वनकर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. वनसंवर्धनासोबत लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.



