अखेर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सावली-हरांबा बस फेऱ्या बंद
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :_ दररोज अवजड वाहनांनी केल्या जाणाऱ्या रेती वाहतुकीमुळे सावली-हरांबा रस्त्याची फार चाळण झाली आहे. ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. सावली ते हरंबा हा जवळपास २० किमीचा रस्ता संपूर्ण उखडलेला आहे. विशेषतः सिंदोळा या गावाजवळील रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. दररोज या मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ६ बसेस धावतात. या बसेसमधून सावली येथील विद्यालय तथा महाविद्यालयात शिकणारे सुमारे ३०० विद्यार्थी आणि शेकडो नागरिक दररोज ये-जा करीत असतात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या मार्गावर मोठा अपघात होण्याची भीती आहे. बसला अपघात झाला किंवा बस उलटली तर अनेक विद्यार्थी जखमी होऊ शकतात किंवा मोठी प्राणहानी होऊ शकते. या संभाव्य धोक्याची सूचना या मार्गावर चालणाऱ्या बसेसच्या चालक व वाहकांनी गडचिरोली आगार प्रशासन व सावली बसस्थानक नियंत्रक यांना देऊन या मार्गावर बस टाकण्यास असमर्थता दर्शवली होती. या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी म्हणून सावली येथील विश्वशांती विद्यालय व रमाबाई आंबेडकर विद्यालयच्या प्राचार्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, सावली तहसीलदारला निवेदन सुध्दा दिले आहे.
तरीसुद्धा या मार्गाची दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी आज गुरुवार १ आक्टोबर पासून या मार्गावर बसेस न चालविण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतला. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणारे विद्यार्थी आज शाळेत पोहचलेच नाहीत. येणाऱ्या काही दिवसातच प्रथम सत्रांत परीक्षा असून विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये बसेस बंद झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण? असा सवाल संतप्त पालकांनी उपस्थित केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या मार्गाची दुरुस्ती करुन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित होण्यापासून वाचवावे अशी मागणी सावली ते हरंबा मार्गावरील असणाऱ्या सर्व गावातील पालकांनी आणि नागरिकांनी केली आहे.सदर रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावे अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा परिसरातील विद्यार्थी पालक नागरिक यांनी दिला.



