चंद्रपुरात उद्या आँल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या वतीने अहिंसा पदयात्रा
‘गांधीजींच्या मार्गाने’ अहिंसा संदेश पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा : काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सत्य, अहिंसा, शांतता आणि मानवतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आँल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस, चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजता ‘गांधीजींच्या मार्गाने — अहिंसा संदेश पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे.
या पदयात्रेत जिल्हा व शहर काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गांधीवादी विचारांवर श्रद्धा असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी तसेच आँल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांनी केले आहे.
पदयात्रा गांधी चौक येथून प्रारंभ होऊन विठ्ठल मंदिर, श्री टॉकीज चौक, रफी अहमद किदवई स्कूल, चोर खिडकी, छोटा बाजार, विजय टॉकीज, अंचलेश्वर गेट, दादमहल मार्गे पुन्हा गांधी चौक येथे पोहोचणार आहे. पदयात्रेदरम्यान महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा, बंधुभाव आणि सामाजिक एकतेच्या विचारांचा जागर करण्यात येणार आहे.
“महात्मा गांधीजींना केवळ जयंतीदिनी अभिवादन न करता त्यांच्या विचारांचा आपल्या आचरणात अंगीकार करणे, हीच त्यांना खरी आदरांजली आहे,” असे सांगून सुभाष धोटे यांनी काँग्रेस परिवारातील सर्व पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, एनएसयूआय, किसान काँग्रेस, अनुसूचित जाती-जमाती विभाग, अल्पसंख्याक विभाग तसेच इतर सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि नागरिकांनी २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता गांधी चौक, चंद्रपूर येथे उपस्थित राहून अहिंसेचा संदेश बुलंद करावा, असे आवाहन केले आहे.



