ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीत १,८०९ कोटींचा एकात्मिक स्टील प्रकल्प; १,२०० रोजगारांची अपेक्षा!

श्री राज आयर्न अँड स्टीलचा महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार; विदर्भाच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणारी महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली असून, गोंडपिपरी तालुक्यात श्री राज आयर्न अँड स्टील प्रॉडक्ट्स प्रा. लि., हैदराबाद यांच्या माध्यमातून तब्बल १,८०९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा एकात्मिक स्टील प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी कंपनीने महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रस्तावित प्रकल्पामुळे गोंडपिपरीसह चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. प्रकल्पातून सुमारे १,२०० थेट रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. प्रकल्पाचे काम नियोजित प्रक्रियेनुसार पुढे गेल्यास २०२९-३० दरम्यान प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

*मंत्रालयात MoU; शासनाकडून आवश्यक सहकार्य*

मुंबईतील मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात श्री राज आयर्न अँड स्टील प्रॉडक्ट्स प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासन यांच्यात हा सामंजस्य करार झाला. उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, कंपनीचे संचालक किशन अग्रवाल व अनुराग अग्रवाल, असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कपिल चंद्रायण तसेच MIDC इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूरचे अध्यक्ष मधुसूदन रूंगटा यांची यावेळी उपस्थिती होती.

MoUनुसार प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या, नोंदणी, मंजुरी, विविध शासकीय परवाने व क्लिअरन्स मिळवून देण्यासाठी शासनाकडून संबंधित धोरणे, नियम व प्रचलित तरतुदींनुसार सहकार्य केले जाणार आहे.

*गोंडपिपरीच्या औद्योगिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा*

गोंडपिपरी तालुका कृषीप्रधान क्षेत्र म्हणून ओळखला जात असताना मोठ्या औद्योगिक गुंतवणुकीचा प्रस्ताव येथे येणे ही महत्त्वाची बाब मानली जात आहे. एकात्मिक स्टील प्रकल्प उभारल्यास स्थानिक पातळीवर रोजगारासोबतच वाहतूक, बांधकाम, सेवा, पुरवठा, लघुउद्योग आणि इतर पूरक व्यवसायांना संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

मात्र, प्रस्तावित प्रकल्प प्रत्यक्षात उभा राहण्यासाठी विविध शासकीय मंजुरी, पर्यावरणीय व इतर वैधानिक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे सध्या हा प्रस्तावित प्रकल्प असून MoU हा पुढील प्रकल्प प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे.

*स्थानिक युवकांच्या रोजगाराकडे लक्ष!*

गोंडपिपरी तालुक्यातील युवकांसाठी या प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेत स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य, कौशल्य प्रशिक्षण आणि स्थानिक लघुउद्योगांना संधी याबाबत ठोस नियोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एकूणच, १,८०९ कोटींची प्रस्तावित गुंतवणूक आणि सुमारे १,२०० थेट रोजगार यामुळे गोंडपिपरीच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने या प्रकल्पाकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रकल्पाची पुढील प्रशासकीय प्रक्रिया कितपत वेगाने पूर्ण होते आणि प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे नागरिकांचे लक्ष राहणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये