हाडपक्या गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध व लेझर लाईट वापर प्रतिबंध
वर्धा पोलीस कठोर कारवाईच्या भुमीकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्ह्यात आगामी काळात हाडपक्या (मस्कऱ्या) गणपती, घटस्थापना, नवरात्रोत्सव, उर्स, संदल तसेच इतर सर्वधर्मीय सण व उत्सवांच्या अनुषंगाने विविध धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रम तसेच मिरवणुका आयोजित करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३६ व कलम ३८(१) अन्वये वर्धा जिल्हा हद्दीत ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध करण्याबाबत आदेश जारी केला आहे. सदर आदेशानुसार दि. २०/०९/२०२६ रोजी ००.०१ वा. पासून दि. १९/१०/२०२६ रोजी २४.०० वा. पर्यंत वर्धा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत आदेश लागू राहणार आहे. तसेच मा. जिल्हाधिकारी वर्षा यांचे BNSS २०२३ चे कलम १६३ अन्वये लेझर लाईट वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश दि. २९.०९.२०२६ चे २८.१०.२०२६ पर्यंत लागू करण्यात आलेला आहे.
लेझर लाईट प्रतिबंध आदेश आणि ध्वनीमर्यादा व निर्बंधांचे काटेकोर पालन करणे आयोजकांसाठी बंधनकारक राहणार आहे. ध्वनीक्षेपकाचा वापर करताना सार्वजनिक शांतता, नागरिकांची सुरक्षितता व आरोग्य यांना बाधा निर्माण होणार नाही, याची संबंधित आयोजकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास अथवा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करतील व कायद्यानुसार आवश्यक कारवाई करतील. परवानगीच्या अटींचे उल्लंघन अथवा ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आयोजकांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ तसेच लागू असलेल्या इतर कायदे व नियमांनुसार कारवाई करण्यात येईल. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांविरुद्ध परवानगी रद्द करणे, ध्वनी निर्माण करणारी उपकरणे जप्त करणे तसेच इतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम १३४ व १३६ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येईल. तसेच कायद्यानुसार ध्वनीक्षेपकाचे साहित्य जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच लेझर लाईट वापराबाबत प्रतिबंध आदेशाचे उल्लंघन केल्यास पोलीसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल असे श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी आवाहन केले आहे.
वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाने सर्व आयोजक मंडळे, धार्मिक संस्था, उत्सव आयोजक, ध्वनीक्षेपक चालक तसेच नागरिकांनी सदर आदेशाचे काटेकोरपणे पालन करून शांततापूर्ण, शिस्तबद्ध व ध्वनीप्रदूषणमुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
29/9/26 पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा, वर्धा



