ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विजय वडेट्टीवार हाच माझा पक्ष – निखिल सुरमवार

आमदार भांगडिया यांची भेट फक्त कौटुंबिक निखिल सुरमवार यांनी पत्रकार परिषदेतून चर्चेला पूर्णविराम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली : काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय तथा बाजार समितीचे संचालक निखिल सुरमवार यांच्या निवासस्थानी भाजपचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी भेट दिल्याने मागील चार दिवसांपासून सावलीच्या राजकीय वर्तुळात तसेच समाजमाध्यमांवर विविध चर्चांना उधाण आले होते. या चर्चांना निखिल सुरमवार यांनी पत्रकार परिषद घेत पूर्णविराम दिला.

        ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार व चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कट्टर विरोधक समजले जातात. मात्र अचानक आमदार भांगडिया हे आमदार वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे बाजार समितीचे संचालक तथा काँग्रेस चे युवा नेते निखिल सुरमवार यांचे घरी भेट दिल्याने व विरोधकांकडून या भेटीचे भांडवल केल्यामुळे निखिल सुरमवार चांगलेच चर्चेत आले होते. यामुळे निखिल सुरमवार यांनी सावली येथील आमदार विजय वडेट्टीवार यांचे जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेत चर्चेस विराम दिला. “मी कायम काँग्रेस पक्षासोबत आणि आमदार विजय वडेट्टीवार हाच माझा पक्ष आहे असे म्हणत भविष्यातही त्यांच्यासोबतच राहणार आहे,” असे स्पष्ट करत सुरमवार यांनी पक्षांतराच्या चर्चांना ठामपणे नकार दिला. आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना सुरमवार म्हणाले की, भांगडिया यांनी स्वतः फोन करून आपण घरी चहापानासाठी येत असल्याचे सांगितले आणि त्यानंतर ते घरी आले. काँग्रेस व सुरमवार कुटुंबाची पाहुण्यांचे स्वागत करण्याची परंपरा असल्याने आपण त्यांचे स्वागत केले. या भेटीला कोणताही राजकीय संदर्भ नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अवेश पठाण हे आपले मित्र असून त्यांचा वाढदिवस त्यावेळी साजरा केला व कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही असे सुरमवार यांनी सांगितले. समाजमाध्यमांवर ‘भाजपमध्ये जाणार का?’ अशा स्वरूपाच्या बातम्या व चर्चा सुरू झाल्याचा उल्लेख करत सुरमवार म्हणाले, “मी काँग्रेसमध्येच असून विजय वडेट्टीवार यांच्यासोबत कायम आहे.” आगामी जिल्हा परिषद निवडणुकीबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस पक्षाने कोणत्याही क्षेत्रातून निवडणूक लढण्याचा आदेश दिल्यास आपण पक्षाच्या आदेशानुसार निवडणूक लढवू, असे त्यांनी सांगितले.

“विरोधकांकडून पक्षात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र कार्यकर्त्यांनी अशा चर्चांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहनही निखिल सुरमवार यांनी केले.

या पत्रकार परिषदेमुळे आमदार भांगडिया यांच्या भेटीनंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर सुरमवार यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली असून, आपण काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्यासोबतच असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

       पत्रकार परिषदेस तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहणे, महिला तालुका अध्यक्ष उषा भोयर, सावलीच्या नगराध्यक्षा साधना वाढई, काँग्रेसचे शहर अध्यक्ष क्रिष्णा राऊत, बाजार समिती सभापती राजू ठाकरे, पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार, बाजार समिती उपाध्यक्ष प्रमोद दाजगाये, नगरसेवक सचिन संगिडवार, प्रितम गेडाम, मुन्ना रस्से, प्रफुल वाळके, आशिष मनबत्तुवार, आशिष पुण्यपवार, प्रशांत राईंचवार आदीसह शेकडो काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये