सरदार पटेल महाविद्यालयात शांताराम पोटदुखे यांच्या आठवणींना उजाळा…
सर्वसामान्य कार्यकर्त्याला जपणारा माणूस..अरविंद पोरेड्डीवार

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ शांताराम पोटदुखे हे चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याचा शैक्षणिक कायापालट करणारे एक आदर्श आणि सुजाण नेते होते. चंद्रपूरसह गडचिरोली या आदिवासी व मागास भागातील तरुणांना शिक्षणाची दारे खुली करून देण्यासाठी त्यांनी शाळा-महाविद्यालये उभारली. सर्वसामान्य कार्यकर्त्याला जपणारा माणूस म्हणून शांतारामजी यांची ओळख होती असे प्रतिपादन सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार यांनी येथे बोलताना केले.
सर्वोदय शिक्षण मंडळाचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्या आठव्या पुण्यस्मरण निमित्त त्यांना येथील सरदार पटेल महाविद्यालयात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. त्यानिमित्ताने झालेल्या आदरांजली कार्यक्रमात त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सदस्य राकेश पटेल, जिनेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
शांताराम पोटदुखे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. शिक्षण क्षेत्रात मोठे काम करणारे शांतारामजी हे स्पष्ट बोलणारे नेते होते. अपवादात्मक अजातशत्रुता आणि सर्वसमावेशक सहिष्णुता ही त्याच्या स्वभावाची वैशिष्ट्येच म्हटली पाहिजे असे सुदर्शन निमकर म्हणाले.
दुर्गम- अतिदुर्गम ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणारे शांतारामजी हे संवेदनशील नेता होते. शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये, यासाठी ते झटले. अडीअडचणीच्या वेळी आपल्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे शांतारामजी होते अशी भावना प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. माहूरे यांनी केले. यावेळी दिवंगत शांताराम पोटदुखे यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपराचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी उत्तम गेडाम, महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



