ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

करिअरची दिशा ठरवा, संधी ओळखा; तयारीला आजच सुरुवात करा

चंद्रपुरात 930 विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन ; जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : दहावी – बारावी नंतर केवळ पारंपरिक अभ्यासक्रमांचा विचार न करता विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, क्षमता आणि उपलब्ध संधी ओळखून करिअरची दिशा निश्चित करावी. ध्येय स्पष्ट करून त्यासाठी आवश्यक शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि कौशल्यांची माहिती घेत आजपासूनच नियोजनबद्ध तयारी सुरू करावी, असा संदेश चंद्रपूर येथे आयोजित भव्य करिअर मार्गदर्शन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.

ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींची माहिती मिळावी तसेच दहावी-बारावीनंतर शिक्षण व करिअरविषयक योग्य निर्णय घेण्यासाठी दिशा मिळावी, या उद्देशाने जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने 22 सप्टेंबर रोजी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनचे सहकार्य लाभले. जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद हायस्कूल तसेच चंद्रपूरमधील खासगी अनुदानित शाळांतील सुमारे 930 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके होते. तर मंचावर आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह तसेच सैनिक स्कूल, चंद्रपूरचे प्राचार्य कॅप्टन अश्विन अनुपदेव यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रशासकीय सेवांपासून संरक्षण दलापर्यंतच्या संधींची माहिती

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत अधिकारी, तज्ज्ञ आणि व्यावसायिकांकडून प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन मिळाले. आयपीएस कुमार सुशांत यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे स्वरूप तसेच IAS, IPS, IFS यांसारख्या अखिल भारतीय व केंद्रीय सेवांमध्ये जाण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक वाटचाल, अभ्यासाचे नियोजन आणि स्पर्धा परीक्षेची तयारी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी पोलीस दलातील विविध पदे, भरती प्रक्रिया आणि करिअरच्या संधींची माहिती दिली. कोरपना येथील उपविभागीय अधिकारी बालाजी कदम यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा, प्रशासकीय सेवांमधील संधी आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या सातत्यपूर्ण अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले.

सूबेदार लक्ष्मण औलकर यांनी भारतीय सशस्त्र दलांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींबाबत माहिती दिली. सैन्य दलात प्रवेशासाठी आवश्यक पात्रता, विविध प्रवेश परीक्षा, शारीरिक व मानसिक तयारी तसेच शिस्तीचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

अभियांत्रिकी, कृषी, पशुवैद्यकीय आणि बँकिंग क्षेत्राचीही ओळख

विभागीय अभियंता जय तिवारी यांनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध शाखा, उच्च शिक्षण आणि बदलत्या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या करिअर संधींची माहिती दिली. कृषी विस्तार अधिकारी आदित्य महल्ले यांनी कृषी शिक्षण, कृषी तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. भाग्यश्री बेलसरे यांनी पशुवैद्यकीय शिक्षण, प्रवेश प्रक्रिया आणि पशुवैद्यकीय क्षेत्रातील विविध करिअर पर्यायांची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. बँक ऑफ इंडियाचे रत्नेश सिंह आणि भूषण वाघ यांनी बँकिंग क्षेत्रातील विविध पदे, स्पर्धा परीक्षा आणि बँकिंगमधील करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

‘करिअरसाठी आजपासून काय करायचे?’ यावर भर

या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ ‘कोणते करिअर निवडावे?’ याची माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता, निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ‘आजपासून कोणती तयारी करावी?’, कोणते शिक्षण घ्यावे, कोणत्या प्रवेश व स्पर्धा परीक्षा द्याव्यात आणि आवश्यक कौशल्ये कशी विकसित करावीत, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवा, पोलीस व संरक्षण दल, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषी, पशुवैद्यकीय, बँकिंग यांसह विविध क्षेत्रांतील संधींची एकाच व्यासपीठावर माहिती उपलब्ध झाल्याने हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये