ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील ऐतिहासिक संस्थानांच्या राजमुद्रेवर विराजमान श्रीगणेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         गणेशोत्सवाची चाहूल लागताच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचीही आठवण होते. श्रीगणेश हा केवळ महाराष्ट्राचा आराध्य देव नसून, त्याचे स्थान इतिहासाच्या पानांवर, राजघराण्यांच्या परंपरेत आणि संस्थानिकांच्या राजमुद्रांवरही अधोरेखित झालेले दिसून येते.

महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील अनेक मराठी संस्थानिक घराण्यांनी भगवान गणेशाला आराध्य दैवत मानल्याचे ऐतिहासिक वस्तूंमधून दिसून येते.

सांगली, मिरज, जमखंडी, कोल्हापूर, सातारा, फलटण, कुरुंदवाड आणि भोर ,मिरज यांसारख्या संस्थानांचा महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचा ठसा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेरही इंदोर, ग्वाल्हेर, देवास, धार, तंजावर तसेच गुजरात आणि कर्नाटकातील काही मराठी राजघराण्यांचा प्रभाव होता. या संस्थानांच्या ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये आणि राजचिन्हांमध्ये श्रीगणेशाचे स्थान विशेषत्वाने आढळते.

भद्रावती येथील ऐतिहासिक स्टॅम्प पेपर व नाणे संग्रहक अमित चंद्रकांत गुंडावार यांनी ऐतिहासिक संस्थानांची नाणी, स्टॅम्प पेपर आणि अन्य दुर्मीळ वस्तू जतन करून ठेवण्याचे काम केले आहे. त्यांच्या संग्रहात जवळपास शंभर ते दीडशे संस्थानांशी संबंधित स्टॅम्प पेपर आणि ऐतिहासिक साहित्य आहे. या संग्रहातील काही स्टॅम्प पेपर तर इतिहासाच्या अभ्यासकांसाठी विशेष आकर्षण ठरावेत असे आहेत.

विशेष म्हणजे जमखंडी संस्थान, कुरुंदवाड संस्थान, सांगली संस्थान आणि धार संस्थान यांच्या काही दुर्मीळ स्टॅम्प पेपरवर श्रीगणेशाची प्रतिमा राजमुद्रेच्या स्वरूपात पाहायला मिळते. या स्टॅम्प पेपरवरील मजकूर मराठी मोडी लिपीत असून, त्यावर अंकित असलेली गणेशप्रतिमा तत्कालीन राजसत्तेच्या श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेची साक्ष देणारी आहे.

या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे होळकरांच्या ऐतिहासिक नाण्यांवरील लेखन आणि चिन्हे. नाण्यांवरील मजकूर, राजघराण्यांच्या संदर्भातील उल्लेख आणि त्यावरील प्रतीकांमधून तत्कालीन राज्यव्यवस्थेचा इतिहास उलगडतो. त्यामुळे हा संग्रह केवळ नाणी किंवा स्टॅम्प पेपरचा संग्रह न राहता, तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा दस्तऐवज ठरतो.

*महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून गणेशभक्तीचा ठसा*

         श्रीगणेशाचे महत्त्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाही. भारताबाहेरील अनेक देशांच्या संस्कृतीतही गणेशाचे विविध स्वरूपात दर्शन घडते. थायलंड आणि इंडोनेशियासारख्या देशांमध्येही गणेशप्रतिमा विविध ऐतिहासिक व सांस्कृतिक संदर्भांत आढळतात.

भारतात पूर्वी जवळपास ६०० संस्थाने अस्तित्वात होती, असे इतिहासात नमूद केले जाते. त्यापैकी विविध संस्थानांच्या नाण्यांवर, शिक्क्यांवर, राजमुद्रांवर आणि सरकारी कागदपत्रांवर तत्कालीन राजघराण्यांच्या श्रद्धा आणि राजकीय ओळखीचे प्रतिबिंब दिसते. अमित गुंडावार यांच्या संग्रहातील दुर्मीळ वस्तू या इतिहासाची प्रत्यक्ष अनुभूती देतात.

भद्रावतीचे श्री वरदविनायक मंदिर हे विदर्भातील गणेशभक्तीच्या परंपरेतील महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते

       गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मंदिराचा आणि ऐतिहासिक संस्थानांच्या गणेशमुद्रांचा संदर्भ एकत्रितपणे पाहिला तर भद्रावतीच्या सांस्कृतिक वारशाचे वेगळेच रूप समोर येते.

एका बाजूला आज भक्तिभावाने गणरायाची प्रतिष्ठापना होत असताना दुसऱ्या बाजूला शेकडो वर्षांच्या इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या स्टॅम्प पेपरवर आणि नाण्यांवर विराजमान झालेला श्रीगणेश पाहायला मिळतो. राजमुद्रेपासून आजच्या गणेशोत्सवापर्यंत श्रीगणेशाची ही वाटचाल महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचीच कहाणी सांगते.

 अमित गुंडावार यांनी जतन केलेला हा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. मोडी लिपीतील मजकूर, संस्थानांच्या राजमुद्रा, दुर्मीळ नाणी आणि स्टॅम्प पेपर यांचे संवर्धन झाल्यास इतिहासप्रेमी, संशोधक आणि विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संस्थानिक इतिहासाचा अनमोल दस्तऐवज उपलब्ध होईल.

ऐतिहासिक संस्थानांची नाणी, स्टॅम्प पेपर आणि राजमुद्रा हा केवळ कागद किंवा धातूचा संग्रह नाही, तर आपल्या समृद्ध इतिहासाचा जिवंत दस्तऐवज आहे. या दुर्मिळ वस्तूंमधून तत्कालीन राज घराण्यांची संस्कृती, श्रद्धा आणि राज्यव्यवस्था आपल्याला समजून घेता येते. विशेषत: राजमुद्रेवर विराजमान असलेले श्री गणेश आपल्या संस्कृती परंपरेचा अनमोल ठेवा आहे. हा इतिहास काळाच्या ओघात नष्ट होऊ नये ,पुढील पिढ्यांना तो पाहता आणि अभ्यासता यावा या उद्देशाने हा संग्रह जतन करीत आहोत .या वारशाचे संवर्धन करणे हीच माझ्यासाठी खरी इतिहास सेवा आहे.

अमित चंद्रकांत गुंडावार, ऐतिहासिक स्टॅम्प पेपर व नाणी संग्रहक, भद्रावती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये