नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भद्रावतीतून नागरिकांना आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, तेथे महाराष्ट्रातील काही नागरिक अडकले असल्यास त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाचे राज्य आपत्कालीन ऑपरेशन्स केंद्र (SEOC) सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भद्रावती येथून नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात येत आहे.
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या नातेवाईकांनी किंवा संबंधितांनी तातडीने शासनाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. आपत्कालीन मदतीसाठी टोल-फ्री क्रमांक १०७० वर संपर्क साधता येणार आहे. तसेच SEOC नियंत्रण कक्षाच्या +९१-९३२१५८७१४३ या क्रमांकावर व्हॉट्सॲप अथवा दूरध्वनीद्वारे माहिती देता येईल.
याशिवाय अधिकृत ई-मेल controlroom@maharashtra.gov.in वर माहिती पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांची माहिती ऑनलाइन नोंदविण्यासाठी शासनाने स्वतंत्र लिंकही उपलब्ध करून दिली आहे.
नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांचे नाव, सध्याचे ठिकाण आणि संपर्क क्रमांक याबाबतची माहिती संबंधित हेल्पलाईनवर किंवा ऑनलाइन माध्यमातून तातडीने नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पूरस्थितीच्या काळात अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणेकडून मिळणाऱ्या माहितीलाच प्राधान्य द्यावे. गरजू नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.



