ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कमिशनखोर भाजप सत्ताकाळात जनता महागाई-बेरोजगारीने होरपळली — आ. विजय वडेट्टीवार

सावलीत काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा ; भर पावसात बैलबंडीवरून शहर भ्रमण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

 हजारोंचा उत्स्फूर्त सहभाग

 महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढ, रासायनिक खतांचे वाढते दर तसेच साखरेच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात सापडली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेचे जगणे कठीण झाले असून, “ना खाऊंगा, ना खाने दूंगा” म्हणणाऱ्यांनीच देश लुटला, असा घणाघाती आरोप विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला.

सावली येथे काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भर पावसातही नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. बैलबंडीवरून शहरातून काढण्यात आलेल्या या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला आक्रोश व्यक्त केला.

यावेळी आ. विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, सत्तेत येण्यापूर्वी सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्याची आश्वासने देण्यात आली. मात्र सत्तेत आल्यानंतर पेट्रोल, गॅस, जीवनावश्यक वस्तू, रासायनिक खते आणि इतर वस्तूंच्या किमती वाढत गेल्या. दुसरीकडे रोजगाराच्या संधी कमी होत असल्याने तरुणांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे शेतकरी, कामगार, महिला, छोटे व्यापारी आणि तरुण वर्ग मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे.

“भाजपच्या सत्ताकाळात जनतेला महागाईची झळ आणि बेरोजगारीची झळ दोन्ही सहन करावी लागत आहे. सरकारच्या धोरणांचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसत आहे,” अशी टीका आ. वडेट्टीवार यांनी केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढत आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना खत, बियाणे, औषधे आणि इतर निविष्ठांचे दर वाढत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. साखरेच्या दरवाढीचा परिणामही सर्वसामान्यांच्या घरगुती अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोर्चादरम्यान महागाई कमी करा, बेरोजगारांना रोजगार द्या, पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढ मागे घ्या, खतांचे दर कमी करा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

भर पावसातही मोर्चामध्ये नागरिकांची उपस्थिती कमी झाली नाही. बैलबंडीवरून शहर भ्रमण करत काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या जनआक्रोश मोर्चातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला.

मोर्चात काँग्रेस नेते दिनेश चिटरनुरवार, तालुका अध्यक्ष नितीन गोहणे, शहराध्यक्ष कृष्णा राऊत,महिला काँग्रेस अध्यक्ष उषाताई भोयर, शहराध्यक्ष भारती चौधरी, नगराध्यक्ष साधना वाढई, लता लाकडे, विजय कोरेवार, राकेश गड्डमवार, कृउबा सभापती राजू ठाकरे, किशोर कारडे, बंडू बोरकुटे, नरेश सुरमवार, विलास यासलवार, निखिल सुरमवार तालुका, शहर, महिला व युवक काँग्रेसचे पदाधिकारी, नगर पंचायत पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, शेतकरी, युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये