बाखर्डी–नवेगाव रस्ता खड्ड्यात ; प्रशासनाचे दुर्लक्ष कायम!
नागरिकांचा जीवघेणा प्रवास!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बाखर्डी–नवेगाव रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका वाढला आहे.
या मार्गावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी, महिला, कामगार तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. “रस्ता आहे की खड्ड्यांची मालिका?” असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर
पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. रात्रीच्या वेळी खड्डे दिसत नसल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
बाखर्डी–नवेगाव रस्त्याची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविण्यासह रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित विभागाने केवळ तात्पुरती डागडुजी न करता दर्जेदार व टिकाऊ रस्ता तयार करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
विकासाच्या गप्पा होत असताना गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अशी अवस्था असेल तर ग्रामीण भागाचा विकास नेमका कधी होणार? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
“रस्ता दुरुस्त करा, अपघात होण्याची वाट पाहू नका!”
बाखर्डी–नवेगाव मार्गाची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करावा, अन्यथा प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थांकडूनआंदोलन करण्यात येईल.
नंदू तेलंग, माजी उपसरपंच नवेगाव



