प्रा. दामाजी डोंगरे यांना आचार्य पदवी प्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील चकगोजोली येथील रहिवासी असलेले आणि राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय, आलापल्ली (नागेपल्ली) येथे कार्यरत प्रा. दामाजी तुळशीराम डोंगरे यांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीतर्फे अर्थशास्त्र विषयात आचार्य (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रा. डोंगरे यांनी “गडचिरोली जिल्ह्यातील महिला स्वयं-सहाय्यता बचत गटांचे जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक विकासातील योगदान” या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. सन २०१०-११ ते २०१९-२० या कालावधीचा अभ्यास करून त्यांनी महिला बचत गटांच्या कार्याचा आर्थिक व सामाजिक विकासावर झालेला परिणाम सखोलपणे मांडला आहे.
हे संशोधन त्यांनी प्रा. डॉ. प्रकाश बी. तितरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणात स्वयं-सहाय्यता बचत गटांची भूमिका, त्यांचे आर्थिक योगदान तसेच सामाजिक परिवर्तनातील सहभाग यावर आधारित हे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
प्रा. डोंगरे यांना आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी, गोजोली _ चक गोजोली वासिय ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.



